मुंबई पोलिस करणार समीर वानखेडेंची चौकशी, अटकेचीही टांगती तलवार

0
110
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः क्रूझवरील ड्रग्ज पार्टी आणि अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर चर्चेत आलेले आणि वादाच्या भोवऱ्यात सापडलेले एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्या भोवतीचा कारवाईचा फास आवळत चालला आहे. आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची डील झाल्याच्या आरोपाची मुंबई पोलिस समीर वानखेडे यांची चौकशी करणार आहेत. मुंबईचे सहपोलिस आयुक्त (कायदा व सुरक्षा) विश्वास नांगरे पाटील यांनी या कामी चार तपास अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आधीच एनसीबीच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले समीर वानखेडे आता मुंबई पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यातही अडकले असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आर्यन खान प्रकरणातील पंच साक्षीदार प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्र दाखल केले असून त्यात त्याने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना मिळणार होते. असा धक्कादायक आरोप करून खळबळ उडवून दिली होती.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

प्रभाकर साईल हा ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच साक्षीदार किरण गोसावीचा अंगरक्षक होता. पुणे पोलिसांनी किरण गोसावीला फसवणुकीच्या एका गुन्ह्यात अटक केली आहे. प्रभाकर साईल, ऍड. सुधा द्विवेदी, ऍड. कनिष्क जैन आणि नितीन देशमुख यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. या विविध तक्रारींची एकत्रित चौकशी करण्यासाठी चार पोलिस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आझाद मैदान विभागाचे सहायक पोलिस आयुक्त मिलिंद खेतले, कुलाबा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सावंत, अंमली पदार्थ विरोधी कक्षातील सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत कारकर, दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश गवळी हे ते चार अधिकारी आहेत. दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त दिलीप सावंत हे या प्रकरणात पर्यवेक्षक अधिकारी म्हणून तर कोळे कल्याणचे पोलिस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत हे सहायक पर्यवेक्षक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

प्रभाकर साईलची आठ तास चौकशीः आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप करणारा एनसीबीचा पंच साक्षीदार प्रभाकर साईलची मुंबई पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा तब्बल ८ तास चौकशी केली. मुंबईचे पोलिस उपायुक्त झोन क्रमांक १ यांच्या कार्यालयात प्रभाकर साईलचा जवाब नोंदवण्यात आला. एनसीबीचे अधिकारी आणि एनसीबीचा पंच साक्षीदार किरण गोसावी यांनी आर्यन खानच्या सुटकेसाठी २५ कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार प्रभाकर साईललने एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानंतर प्रभाकरचा हा जवाब नोंदवण्यात आला आहे. प्रभाकर हा किरण गोसावीचा अंगरक्षक आहे. एनसीबीनेही प्रभाकरला साक्षीदार बनवले होते. २ आणि ३ ऑक्टोबर दरम्यान घडलेल्या एकूणच घटनाक्रमाची तपशीलवार माहिती आपण पोलिसांना दिली, असे प्रभाकरने सांगितले. किरण गोसावी आणि समीर वानखेडे यांचे जुने संबंध असून तो समीर वानखेडेंना नेहमीच भेटायचा, असेही प्रभाकरने पोलिसांना सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा