क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास आता एनआयएकडे जाणार?

0
152
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः क्रूझवरील ड्रग्ज पार्टा प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच एनआयएकडे हस्तांतरित केला जाण्याची शक्यता आहे. एनआयएच्या तीन अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयात भेट दिली. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाची सर्व माहिती एनआयएच्या अधिकाऱ्यांनी एनसीबीकडून घेतली. दिल्लीतही एनसीबी आणि एनआयएच्या अधिकाऱ्यांची याच मुद्यावर प्रदीर्घ बैठकही झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनसीबीचे महासंचालक एस.एन. प्रधान यांच्याशी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली होती. या प्रकरणाचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियाशी संबंध जोडण्यात आल्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित केला जाऊ शकतो, असे एनसीबीच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

शुक्रवारी एनआयएच्या अधिकाऱ्यांच्या तीन सदस्यीय पथकाने एनसीबीच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या. दिल्लीमध्ये एनसीबी आणि एनआयएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतरच हे पथक मुंबईतील एनसीबीच्या कार्यालयात पोहोचले होते.

एनआयएच्या या तीन अधिकाऱ्यांच्या पथकाने एनसीबीचे मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि उप महासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत एनआयएच्या पथकाने एनसीबीकडून आर्यन खान आणि अन्य आरोपींवरील केसबाबत माहिती घेतली.

हेही वाचाः अखेर २६ दिवसांनंतर आर्यन खान तुरूंगाबाहेर, सुटकेनंतर लगेच ‘मन्नत’कडे रवाना

एनआयएने विशेषतः आर्यन खानचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पेडलरशी असलेल्या कथित संबंधांबाबतची कागदपत्रे एनसीबीकडे मागितली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी काही महत्वाची कागदपत्रे एनआयएच्या पथकाला दाखवली. त्यापैकी काही कागदपत्रे एनआयएचे अधिकारी सोबतही घेऊन गेल्याचे सांगण्यात येते.

एनसीबी अधिकाऱ्यांशी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी केलेली चर्चा आणि घेतलेली माहिती या पार्श्वभूमीवर आता क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास एनआयएकडे हस्तांतरित केला जाऊ शकतो, असे मानले जाहे.

न्यायालयात दिली होती माहितीः क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पेडलरशी संबंध असल्याची माहिती एनसीबीने मुंबईच्या एनडीपीएस कोर्टात दिली होती. आर्यन खान हा परदेशात राहणाऱ्या ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता आणि ड्रग्जचा व्यावसायिक पुरवठा करण्याबाबत त्याची चर्चा सुरू होती, असा दावा एनसीबीने कोर्टात केला होता. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाला हा आंतरराष्ट्रीय अँगल आल्यामुळेच आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा