राज्यातील सर्व जिल्ह्यात शुक्रवारी ड्राय रन, १४ जानेवारीपर्यंत लसीकरणही सुरू होण्याचे संकेत

0
86
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई/नवीदिल्लीः देशातील निवडक जिल्ह्यांत कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेतल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने शुक्रवार, ८ जानेवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांत कोरोना लसीकरणाचा ड्राय रन घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, देशभरात १३ ते १४ जानेवारी दरम्यान कोरोनाचे प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात होईल, असे संकेत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिले आहेत.

 ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला असून महाराष्ट्रात या स्ट्रेनची लागण झालेले ८ रुग्ण आढळून आले आहेत. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. या लसीकरण मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून राज्यातील सर्व जिल्ह्यांत शुक्रवारी ड्राय रन घेतला जाणार आहे. मुंबईमध्ये शुक्रवारीच ड्राय रन होईल, असे टोपे म्हणाले.

राज्यातील या ड्राय रनमध्ये कोविन ऍप योग्य प्रकारे चालतो का? ज्या ठिकाणी लसीकरण होणार आहे, त्या ठिकाणी इंटरनेट योग्य प्रकारे चालते की नाही? लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये योग्य समन्वय आहे की नाही? याचा संपूर्ण आढावा या ड्राय रनमध्ये घेतला जाणार आहे. त्यातून दुरुस्ती करायला वाव असतो. म्हणून हा ड्राय रन गरजेचा असल्याचे टोपे म्हणाले.

 कोरोनावरील लसीला किंमत ठेवल्यास प्रत्येक नागरिक ती लस मोफत घेऊ शकणार नाही. सध्या केंद्र सरकार फ्रंटलाइन वर्करला ही लस मोफत देणार असल्याचे सांगत आहे. मात्र ही लस गरिबांनाही मोफत देण्यात आली पाहिजे. लसीच्या दोन डोजचा ५०० रुपये खर्च केंद्र सरकारनेच उचलला पाहिजे. तशी मागणी आपण केंद्र सरकारकडे करणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली.

पुढील आठवड्यात सुरुवात होऊ शकते प्रत्यक्ष लसीकरणः दरम्यान, देशात पुढील आठवड्यात कोरोनावरील लसीचे प्रत्यक्ष लसीकरण होऊ शकते, असे संकेत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिले. लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर दहा दिवसांत लसीकरण सुरु करण्याची आमची तयारी आहे, असे भूषण म्हणाले. ३ जानेवारीला डीसीजीआयने सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीला मंजुरी दिली. तेव्हापासून दहा दिवस म्हणजे १३ ते १४ जानेवारीपासून प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होऊ शकते.

वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नाव नोंदणीची गरज नाहीः वैद्यकीय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्याची गरज नाही. सामान्य नागरिकांना मात्र प्रत्यक्ष लसीकरणासाठी नाव नोंदणी करावी लागणार आहे. देशात कोरोना लस साठवणुकीसाठी मुंबई, कर्नाल, चेन्नई आणि कोलकातामध्ये चार केंद्रे आहेत. त्यासोबतच देशात अशी ३७ लहान केंद्रे आहेत, असेही राजेश भूषण म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा