औरंगाबादेत बनावट नोटांचे रॅकेटः नव्या नोटा हुबेहुब छापणाऱ्या टोळीचा उच्चशिक्षित म्होरक्या गजाआड

0
350

औरंगाबादः काळा पैसा आणि बनावट नोटांचा गोरखधंदा बंद करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका झटक्यात नोटबंदी करून झटका दिल्याचे परिणाम भारतीय अर्थव्यवस्था आजपर्यंत भोगत असतानाच ज्या उद्देशाने नोटबंदी करण्यात आली होती, तो उद्देश सफल झाला नसून बनावट नोटांचे रॅकेट अजूनही कार्यरत असल्याचे औरंगाबाद पोलिसांनी केलेल्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. बनावट नोटा छापणाऱ्या कारखान्याचा औरंगाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला असून या नोटा छापणाऱ्या टोळीच्या उच्च शिक्षित म्होरक्याला गजाआड केले आहे.

काही जण पुंडलिकनगर रोडवरील सुपर वाईन शॉपमध्ये बनावट नोटा देऊन दारू खरेदी करत आहेत, अशी माहिती पुंडलिकनगर पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक एस. के. खटाने यांनी यांनी सापळा रचला. या सापळ्यानुसार मंगळवारी सायंकाळी ७ वाजता रघुनाथ ढवळपुरे यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे विचारपूस केली असता समरान उर्फ लक्की रशीद शेख हा त्याचा साथीदार नितीन चौधरी याच्या मदतीने मुकुंदवाडीत किरायाने घेतलेल्या रूममध्ये बनावट तयार करून त्या नोटा अक्षय अण्णासाहेब पडूळ आणि दादाराव पोपटराव गावडे यांच्या मार्फत बाजारात चालवण्यासाठी विक्री करत असल्याचे समोर आले.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

समरान हा पुंडलिकनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो कलम ४८९ (अ), ४८९ (ब), ४८९ (क), ४८९(ड), ४२० ३४ असे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात तो सध्या जामिनावर आहे. रघुनाथने दिलेल्या माहितीवरून  खटाणे आणि त्यांच्या पथकाने  छापा मारून समरान उर्फ लक्की रशीद शेख (वय ३०, जसवंतपुरा, नेहरूनगर, औरंगाबाद), नितीन कल्याणराव चौधरी (वय २५, मुकुंदवाडी), अक्षय अण्णासाहेब पडूळ (वय २८, गजानन नगर, गल्ली नंबर १), दादाराव पोपटराव गावंडे (वय ४२, गजानन नगर गल्ली नं.१) रघुनाथ चैनदास ढवळपुरे (वय ४९, धंदाः मिस्त्री, गजानन नगर) यांना अटक केली आहे.

 या आरोपींच्या ताब्यातून ५००, १०० व ५० रुपयांच्या सुमारे १ लाख २० हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारे कॉम्प्यूटर, ऑल इन वन प्रिंटर, कटर स्केल, कागद असे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. तयार केलेल्या बनावट नोटांची वाहतूक करण्यासाठी वापरलेली महिंद्रा लोगन कार आणि संपर्कासाठी वापरण्यात येत असलेले पाच मोबाईल असा ३ लाख १० हजार ३९० रुपयांचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे.

कसे करायच्या बनावट नोटा तयार?: आरोपी समरान उर्फ लक्की रशीद शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत उच्चशिक्षित गुन्हेगार आहे. तो चलनात असणाऱ्या नोटा स्टॅण्डर्ड कागदावर प्रिंटरद्वारे स्कॅन करून त्याची प्रिंट काढून कटर व स्केलच्या सहाय्याने हुबेहुब दिसणारी नोट तयार करण्यात  पटाईत आहे. बनावट नोटा तयार केल्याप्रकरणी त्याच्यावर याआधीही गुन्हा दाखल झाला आहे. यावेळी त्याने नवीन साथीदारांना प्रशिक्षण देऊन हा गोरखधंदा सुरू केला होता.

नवीन नोटांची बनावट नोट तयार करता येणार नाही, असा दावा नव्या नोटा चलनात आणताना केला गेला असला तरी पुंडलिकनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे बनावट नोटा चलनात आणणारे रॅकेट अजूनही सक्रीय असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त निखील गुप्ता, परिमंडळ -२ चे उपायुक्त दीपक गिऱ्हे, उस्मानपुरा विभागाचे सहायक आयुक्त विशाल ढुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुंडलिकनगरचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक पोलिस निरीक्षक शेषराव खटाणे, सहायक फौजदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, गणेश डोईफोडे, गणेश वैराळकर, जालींदर मांटे, संतोष पारधे, दीपक जाधव, राजेश यदमळ, कल्याण निकम, प्रवीण मुळे, रज्जूसिंग सुलाने, अजय कांबळे, कोमल तारे प्रशांत भगरे यांनी केली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा