अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक

0
119
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी छापेमारी करून झाडाझडती घेतल्यानंतर आज त्यांचे पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही शुक्रवारीच ताब्यात घेण्यात आले होते.

भाजप नेते सागर मेघे यांचे नातेवाईक आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेले १०० कोटी रुपये वसुलीचे आरोप आणि काळा पैसा या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे परमबीर सिंग यांचा मुलगा रोहन सिंग यांचा विवाह भाजप नेते सागर मेघे यांची मुलगी राधिकाशी झालेला आहे. सागर मेघे हे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचे चिरंजीव आहेत.

परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यामुळे अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यापासून अनिल देशमुख यांची विविध केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे.

या आधी अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सीबीआयने छापेमारी केली होती. त्यानंतर शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने त्यांच्याबरोबरच त्यांच्या निकटवर्तीयांवरही छापेमारी केली होती.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात स्फोटके असलेली गाडी आढळली होती. ही गाडी उभी करण्याच्या प्रकरणात मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावर असलेले परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद होती. त्यामुळे त्यांना या पदावरून हटवण्यात आले. पदावरून हटवण्यात आल्याच्या रागातून त्यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पोलिस आयुक्तपदावर असताना परमबीर सिंग गप्प का होते, असा सवाल करत अनिल देशमुखांनी परमबीर सिंगांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा