उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नातेवाईकांचा साखर कारखाना ईडीकडून जप्त

0
481
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील साखर कारखाना जप्त केला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे आधीच ईडीचे झेंगट चालू असताना ईडीने केलेली ही कारवाई अजित पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.

 ईडीने जप्त केलेला सातारा जिल्ह्यातील हा कारखाना अजित पवारांचे नातेवाईक राजेंद्रकुमार घाडगे यांच्या मालकीचा आहे. घाडगे हे अजित पवारांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे ईडीच्या या कारवाईला राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त झाले आहे.

 राज्य सहकारी बँकेत २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याचा तपास सुरू असतानाच अजित पवारांचे नातेवाईक राजेंद्र कुमार घाडगे यांच्या जरंडेश्वर कारखान्याने या बँकेकडून घेतलेले कर्ज बुडवल्याचे समोर आले आहे, असे ईडीचे म्हणणे आहे. त्याच कारणावरून ईडीने कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे.

जरंडेश्वर साखर कारखाना आधी सहकारी साखर कारखाना होता. नंतरच्या काळात त्याची विक्री होऊन त्याचे खासगीकरण झाले आणि राजेंद्रकुमार घाडगे यांच्या तो मालकीचा झाला. अनेक साखर कारखान्यांनी राज्य सहकारी बँकेकडून कर्ज घेतले आणि नंतर ते बुडवले. सहकारी साखर कारखान्यांची कमी भावात विक्री झाली आणि हे कारखाने राजकीय व्यक्तींनी खरेदी केले, असा आरोप आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्यासाठी भाजप आणि केंद्र सरकार केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करत आहे, असा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्षांकडून केला जात असतानाच सक्तवसुली संचालनालयाने ही कारवाई केली आहे. या आधी सक्तवसुली संचालनालयाने आठवडाभरापूर्वीच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या निवास्थानी छापे टाकले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा