संजय राऊतांवर ईडीची कारवाईः अलिबागेतील ८ प्लॉट आणि दादरमधील रहाता फ्लॅट ईडीकडून जप्त

0
18
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर असलेले शिवसेनेचे फायरब्रँड खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध आज अखेर ईडीने प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उचलत त्यांचे अलिबागमधील ८ प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे. दादरमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रवीण राऊत यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.

मुंबईतील १ हजार ३४ कोटी रुपयांच्या कथित पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून या घोटाळ्यातील पैश्यांचा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आला. त्यामुळे ईडीने ही कारवाई केली आहे. संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत आणि सुजीत पाटकर यांची पत्नी स्वप्ना पाटकर यांच्या नावाने अलिबागमधील हे ८ भूखंड खरेदी करण्यात आले. या भूखंडांची किंमत ६० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जाते.

 गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे ईडीच्या रडारवर आहेत. संजय राऊतांवर ईडीची कारवाई होणार, असे भाजप नेते वारंवार सांगत होते. भाजप नेत्यांचे हे इशारे देणे सुरूच असताना ईडीने आज, मंगळवारी संजय राऊतांवर थेट कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा फेरा थेट संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणांचे पुढचे लक्ष्य मातोश्री असणार का?, याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत. विशेष म्हणजे संजय राऊत हे दिल्लीमध्ये असताना ईडीने ही कारवाई केली आहे.

… तर ही सर्व मालमत्ता भाजपला दान करूः ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कुठली प्रॉपर्टी? आम्ही काय प्रॉपर्टीवाले लोक आहोत का?  २००९ मध्ये कष्टाच्या पैशातून आम्ही ही जागा आणि घर घेतले आहे. त्याची आमच्याकडे कुणी साधी चौकशीही केली नाही. विचारणा केली नाही. एवढेच नव्हे तर ईडीने सध्या आम्ही वास्तव्यास असलेला दादरमधील फ्लॅटही जप्त केला आहे. हे जे काही गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, अशा गैरव्यवहारातून एक रुपया जरी आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता खरेदी केल्याचे सिद्ध झाले तर ही सर्व मालमत्ता आम्ही भाजपला दान करायला तयार आहोत, असे संजय राऊत म्हणाले. काहीही केले तरी महाराष्ट्र सरकार पडत नाही. मागे सरकार पाडण्यासाठी माझ्यावर प्रचंड दबाव आणला गेला. पण हा संजय राऊत बाळासाहेबांचा सैनिक आहे. कुणाच्या बापाला घाबरत नाही. आता ईडीने माझी संपत्ती जप्त करून माझ्याविरोधात मोहीम उघडली आहे. पण मला सांगायचे आहे की त्यांचा बाप (भाजपचा) आला तरी मी घाबरत नाही. गुडघे टेकणार नाही. माझ्यावर झालेले आरोप सिद्ध झाले तर मी समाजकारण, राजकारण सोडून देईन, असेही संजय राऊत म्हणाले.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

मुख्यमंत्री आणि शरद पवारांचा फोनः ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोन केला. दोघांशीही माझे बोलणे झाले. कारवाईच्या अनुषंगाने त्यांनी विचारपूस केली. माझ्या पक्षातील अनेक सहकाऱ्यांचे मला फोन आले. मी त्यांना इतकेच सांगितले की, मी घाबरत नाही. मौनात मी नाही आता भाजप जाईल, असेही संजय राऊत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा