आमदार रत्नाकर गुट्टे यांना ईडीचा दणकाः गंगाखेड शुगरची २५५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

0
986
संग्रहित छायाचित्र.

परभणीः शेतकऱ्यांच्या नावाने दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज परस्पर उचलून ती रक्कम स्वतःच्या कंपन्यांमध्ये गुंतवल्यामुळे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आलेले गंगाखेडचे आमदार आणि महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रत्नाकर गुट्टे यांची गंगाखेडसह परभणी, बीड आणि धुळे येथील २५५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून ईडीने मालमत्ता जप्तीची कारवाई सुरु केली. ही कारवाई आजही सुरु राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या परभणी जिल्ह्यातील कारखान्याच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्जे घेतली. शेतकऱ्यांच्या नावावर घेतलेल्या कर्जाची रक्कम गुट्टे यांनी धुळे जिल्ह्यातील योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड येथील गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडसह अन्य कंपन्यांमध्ये गुंतवल्याचे ईडीच्या तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली.

हेही वाचाः मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचा शासन निर्णय जारी, विशेष मोहीम राबवून देणार प्रमाणपत्रे

ईडीने बुधवारी रात्री उशिरापर्यंत केलेल्या जप्तीच्या कारवाईत गंगाखेड शुगर अँड एनर्जी लिमिटेडची २४७ कोटींची यंत्रे, ५ कोटी रुपये किंमतीची जमीन, याच कारखान्याचे १ कोटी ९० लाख रुपयांचे समभाग, धुळे जिल्ह्यातील योगेश्वरी हॅचरीज आणि गंगाखेड सोलार पॉवर लिमिटेडच्या परभणी, बीड आणि धुळे येथील बँक खात्यातील सुमारे दीड कोटी रुपये किंमतीची गुंतवणूक या मालमत्तांचा समावेश आहे.

आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावाने दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे कर्ज परस्पर उचलल्याचा आरोप आहे. गंगाखेडचे माजी आमदार मधुसुदन केंद्रे यांनी या बाबतची तक्रार केली होती. विद्यमान सामाजिक न्यायमंत्री आणि विधान परिषदेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत याबाबत आवाज उठवून कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास हाती घेतला होता.

या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हा अन्वेषण शाखेनेही (सीआयडी) केला. सीआयडीने २६ मार्च २०१९ रोजी रत्नाकर गुट्टे यांना अटक केली होती. त्यानंतर रत्नाकर गुट्टे हे सुमारे वर्षभर तुरुंगात राहिले. ५ मार्च २०२० रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका झाली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा