नवाब मलिक ईडीच्या ताब्यात, सकाळी सात वाजेपासून चौकशी सुरू; राजकारण तापले

0
166
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडावर आले आहेत. आज सकाळपासूनच मलिक यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरू असून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात ही चौकशी सुरू असल्याचे समजते. या चौकशीतून नेमके काय निष्पन्न होणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, ईडीच्या या कारवाईवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.

 ईडीचे अधिकारी आज बुधवारी पहाटेच नवाब मलिक यांच्या घरी धडकले आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या डी गँगशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीला सहकार्य करा, असे त्यांनी मलिक यांना सांगितले. त्यानंतर ईडीचे अधिकारी मलिक यांना घेऊन ईडी कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांची सकाळी सात वाजेपासून चौकशी सुरू आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवडाभरापूर्वी ईडीने मुंबईत विविध ठिकाणी डी गँगशी संबंधित मनी लाँडरिंगप्रकरणात छापेमारी केली होती. दाऊत इब्राहीमची बहीण हसीना पारकरच्या घरीही ईडीने छापेमारी केली होती आणि काही दस्तऐवज जप्त केले होते. मनी लाँडरिंगशी संबंधित या प्रकरणात एका बड्या राजकीय नेत्याचाही सहभाग असल्याचे या छापेमारीत समोर आले होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच ईडीचे एक पथक आज सकाळी सकाळीच नवाब मलिक यांच्या घरी धडकले आणि चौकशी करण्यासाठी त्यांना आपल्या कार्यालयात घेऊन गेले. सकाळी सात वाजेपासून मलिक यांची चौकशी सुरू आहे.

 देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरूनच केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहीत आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू, असा इशारा नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वीच दिला होता. त्यानंतर आज ईडीने आज त्यांनाच चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पवार म्हणाले-मुस्लिम कार्यकर्ता असला की दाऊदचे नाव घेतले जातेः ईडीच्या या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचे हे उदाहरण आहे. आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे घडेल. कारण नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात. त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जाईल, याची आम्हाला खात्री होतीच. त्यामुळे त्याबद्दल अधिक भाष्य करण्याची गरज नाही, असे पवार म्हणाले. काही झाले तर आणि विशेष करून मुस्लिम कार्यकर्ता अशला तर दाऊदचे नाव घेतले जाते. मी राज्याचा मुख्यमंत्री असतानाही असा आरोप झाला होता. त्यावेळीही असेच वातावरण निर्माण करण्यात आले होते. त्याला आता २५ वर्षे झाली. पुन्हा तशीच नावे घेऊन लोकांना बदनाम करणे, त्रास देणे आणि सत्तेचा गैरवापर करण्याचे काम सुरू आहे, असेही पवार म्हणाले.

ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे आंदोलनः दरम्यान, ईडीने नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण तापले असून ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. ईडीच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

ना डरेंगे ना झुकेंगे…: ईडीच्या कार्यालयात नवाब मलिकांची चौकशी सुरू असतानाच नवाब मलिक यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून सूचक इशारा देण्यात आला आहे. ना डरेंगे ना झुकेंगे!  Be Ready For 2024 असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली आहे. २०२४ पर्यंत हे सगळे चालणार आहे. २०२४ पर्यंत ते आहेत आणि त्यानंतर आम्ही आहोत. २०२४ नंतर ज्या गोष्टी घडणार आहेत, त्याची तयारी तपास यंत्रणांनी ठेवावी, असा इशाराही राऊत यांनी ईडी आणि भाजपला दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा