शरद पवारांना प्रवेश नाकारून ईडी ‘पिडा’ टाळून घेणार?, दक्षिण मुंबईत जमावबंदीचे आदेश

0
168

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आज दुपारी दोन वाजता स्वतःहोऊन सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात हजर रहाणार असल्यामुळे कोंडीत सापडलेल्या ईडीकडून त्यांना कार्यालयात प्रवेश नाकारून ही ‘पिडा’ टाळण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आक्रमक पवारांच्या या पवित्र्यामुळे ईडी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी शरद पवारांना घराबाहेर न पडण्याची सूचनाही केल्याचे सांगितले जात आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने शरद पवारांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सोमवारच्या या घडामोडीपासूनच शरद पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मी नेमका काय गुन्हा केला, हे स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याकडूनच समजून घेतो, असे पवारांनी जाहीर करून टाकल्यामुळे ईडीचे अधिकारी अडचणीत आले आहेत. चौकशीची कोणतीही नोटीस न बजावता एखादी व्यक्ती स्वतःहोऊन ईडीच्या कार्यालयात हजर होण्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे त्याला कसे सामोरे जायचे हा ईडीच्या अधिकाऱ्यांना पडलेला यक्ष प्रश्न आहे.

दरम्यान, ईडीचे कार्यालय आणि पवारांचे सिल्व्हर ओक निवासस्थान येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दक्षिण मुंबईत राष्ट्रवादी भवन आहे. तेथून हाकेच्या अंतरावर ईडीचे कार्यालय आहे. ड्रोनच्या साह्याने पोलिस परिस्थितीवर नजर ठेवून आहेत. राष्ट्रवादी भवनासमोर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निदर्शने करत आहेत. ईडी कार्यालय परिसरात गर्दी करू नका, असे आवाहन शरद पवारांनी करूनही कार्यकर्ते मोठ्या संख्येने गोळा होत आहेत. एकंदरितच शरद पवारांचा हा ‘गेम’ ईडी आणि राज्य सरकारला अडचणीचा ठरणारा दिसू लागला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा