आक्रमक शरद पवारांच्या ‘पिडे’मुळे ईडीच धास्तावले; काय करायचे समजेना, अधिकारी बुचकाळ्यात

0
1651

मुंबई/ सुनिल वरखडे

राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवलेल्या सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी) अधिकारी पवारांच्या आक्रमकतेमुळे चांगलेच धास्तावले आहेत. ठरल्याप्रमाणे आपण शुक्रवारी दुपारी दोन वाजता ईडीच्या कार्यालयात हजर रहाणार आहोत, अशी घोषणा पवार यांनी ट्विट करून केली आहे. चौकशीची कोणतीही नोटीस न देता स्वतःहोऊन कार्यालयात हजर राहिलेल्या व्यक्तीचा जवाब नोंदवून घेण्याची तरतूदच नाही. परिणामी शुक्रवारी शरद पवार कार्यालयात दाखल झाले तर त्यांना कसे सामोरे जायचे, हा प्रश्‍न ईडीच्या अधिकाऱ्यांना सतावू लागला आहे. आजवर ईडीची ‘पिडा’मागे लागली की जवळपास सर्वच राजकीय नेते गांगारून जायचे. त्यामुळे ईडीची ‘पिडा’ नको रे बाबा म्हणत पक्षांतर करण्यासारखे निर्णय घेऊन त्यांनी यातून सुटका करून घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र इतरांच्या मनात धडकी भरवणाऱ्या ईडीच्या मागे आक्रमक पवारांचीच ‘पिडा’ लागल्यामुळे अधिकारी धास्तावून गेले आहेत.

गुन्हा दाखल झाल्याच्या दिवसापासूनच शरद पवार आक्रमक बनले. मी नेमका काय गुन्हा केला, हे ईडीच्या अधिकाऱ्यांकडून मीच समजून घेतो. त्यासाठी शुक्रवारी मी स्वतःहोऊन ईडीच्या कार्यालयात जाणार आहे, असे त्यांनी जाहीर करून टाकल्यामुळे ईडीचे अधिकारी बॅकफूटवर गेले आहेत. ईडीने अद्याप पवारांना चौकशीची नोटीस बजावलेली नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती विनानोटीस कार्यालयात आली तर तिचा जबाब नोंदवून घेण्याची कायद्यात तरतूदच नाही. चौकशीला बोलावलेल्या व्यक्तींवर दहा-दहा तास प्रश्‍नांचा भडिमार करणाऱ्या ईडीच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी मात्र उलटीच वेळ येण्याची चिन्हे आहेत. शरद पवारांकडूनच त्यांच्यावर ‘मी काय गुन्हा केला’ या प्रश्नासह अन्य प्रश्नांचा भडिमार होण्याचीही शक्यता आहे. ईडीच्या इतिहासात आजवर असा प्रसंग कधीच आला नव्हता. त्यामुळेच आक्रमक पवारांच्या या ‘पिडे’ला कसे सामोरे जायचे?, या प्रश्नाने ईडीचे अधिकारी गांगारून गेले आहेत, असे सूत्रांनी सांगितले. ईडीकडून पवारांना लेखी निवेदन देण्याची विनंती केली जाण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.

 राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच राज्य सहकारी बँक घोटाळ्यात ईडीने या बँकेवर कधीही संचालक न राहिलेल्या शरद पवारांसह त्यांचे पुतणे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 70 राजकीय नेत्यांविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. भाजप सरकारकडून विरोधी पक्ष नेत्यांना नामोहरम करण्यासाठी ईडीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप होत असतानाच पवारांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने ईडीच्या दुरुपयोगाबाबत सर्वसामान्यांच्या मनातील शंकेला बळकटी मिळाली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही शिखर बँकेच्या घोटाळ्याच्या पुराव्यात शरद पवारांचे नाव कुठेच नव्हते. ईडीने ते पुढे कसे आणले, याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा