शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी, कार्यालयासह १० ठिकाणांवर ईडीचे छापे

0
297
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज सकाळी छापे टाकले. मनी लॉडंरिगशी संबंधित प्रकरणात ईडीच्या पथकांनी सरनाईक यांच्या अनेक ठिकाणांवर सर्च ऑपरेशन केले आहे.

मनी लॉडंरिगशी संबंधित प्रकरणांचा तपशील ईडीने अद्याप जाहीर केलेला नाही. किंवा या छाप्यांशी संबंधित कोणतेही अधिकृत निवेदन ईडीकडून जारी करण्यात आलेले नाही.

सरनाईक हे ठाण्यातील ओवळ-माजीवाडा मतदारसंघाचे शिवसेना आमदार आहेत. ते शिवसेनेचे प्रवक्ते आणि मीरा-भाईंदरचे संपर्क प्रमुखही आहेत. ईडीच्या पथकाने सरनाईक यांच्या विहंग ग्रुपच्या कार्यालयासह दहा ठिकाणांची झाडाझडती घेतली आहे.

 चित्रपट अभिनेत्री कंगना रनौत हिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर तिच्या कानाखाली जाळ काढण्याची घोषणा केल्यामुळे सरनाई महिनाभरापूर्वी चर्चेत आले होते. कंगनाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

मुंबईत ईडी असताना पाठवले दिल्लीचे पथकः विशेष म्हणजे प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर छापेमारी करण्यासाठी दिल्लीतून ईडीचे पथक पाठवण्यात आले आहे. या पथकासोबत सीआरपीएफचे पथकही देण्यात आले आहे. मुंबईत ईडीचे कार्यालय आहे. असे असतानाही या कारवाईसाठी दिल्लीतून पथक का पाठवण्यात आले?, असा सवाल केला जात आहे.

भाजपकडून केंद्रीय सत्तेचा गैरवापर, पण आम्ही कोणाच्या बापालाही घाबरत नाहीः प्रताप सरनाईक आणि त्यांची मुले घरी नसताना अशा प्रकारे कारवाई करून ईडीने नामर्दानगी दाखवली आहे. भाजप आपल्या केंद्रातील सत्तेचा गैरफायदा घेत आहे. पण आम्ही कोणाच्या बापालाही घाबरत नाही. केवळ नोटीस पाठवण्यावर न थांबता तुम्ही अटक जरी केली तरी आम्ही झुकणार नाही. ईडीची ही कारवाई केवळ राजकारण आहे. हा कारवाई केवळ सूडबुद्धीने केलेली आहे. आज दिल्लीवरून पथक पाठवले, उद्या इंटरपोलकडून जरी पाठवले तरी चालेल. या प्रकरणाची सुरवात तुम्ही केली असेल तर शेवट आम्ही करणार आहोत, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी या कारवाईवर टिकास्त्र सोडले आहे. या कटामुळे महाविकास आघाडी सरकारला काहीही फरक पडणार नसल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा