‘व्हिडीओकॉन’च्या मुंबई,औरंगाबादेतील ठिकाणांवर ईडीचे छापे; मनी लाँडरिंग प्रकरणात मोठी कारवाई

0
478
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी व्हिडीओकॉन कंपनीचे मालक वेणूगोपाल धूत आणि राजकुमार धूत यांच्या मुंबई आणि औरंगाबादेतील घर व कार्यालयांवर छापे टाकले. व्हिडीओकॉन कंपनी आणि कंपनीचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांच्याविरोधात ईडी मनी लॉडरिंग प्रकरणाचा तपास करत असून त्या प्रकरणाशी संबंधित हे छापे टाकण्यात आले. आफ्रिकेतील मोझाम्बिक तेल क्षेत्राच्या विक्रीत व्हिडीओकॉन कंपनीने कर्ज घोटाळा केल्याचा आरोप आहे. आयसीआयसीआय बँक कर्जप्रकरण आणि मोझाम्बिक तेल क्षेत्र विक्री घोटाळ्यात ही कारवाई करण्यात आली.

व्हिडीओकॉन कंपनी आणि कंपनीचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने एकाच वेळी ही छापेमारी केली. ईडीच्या पथकाने व्हिडीओकानशी संबंधित मुंबईतील मलबार हिल आणि गोवंडी भागात छापे टाकले. औरंगाबादेतही त्याचवेळी छापे टाकण्यात आले आहेत. ही कारवाई अद्यापही सुरूच असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 २०१२ मध्ये आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन समूहाला ३ हजार २५० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. बँकेच्या तत्कालीन सीईओ चंदा कोचर यांनी या कर्जपुरवठ्यात महत्वाची भूमिका निभावल्याचा आरोप आहे. या कर्ज प्रकरणाच्या बदल्यात व्हिडीओकॉनने चंदा कोरच यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत ६४ कोटी रुपये गुंतवले होते. ही ६४ कोटी रुपयांची रक्कम लाच म्हणून देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात चंदा कोचर, व्हिडीओकॉनचे चेअरमन वेणूगोपाल धूत आणि अन्य काही जणांविरोधात पीएमएलए कायद्यांतर्गंत एफआयआरही दाखल झाला आहे.

 दुसरे प्रकरण आफ्रिकेतील मोझाम्बिक तेल उत्खनन क्षेत्राच्या विक्रीशी संबंधित आहे. भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वातील बँकांच्या कॉन्सोट्रियमला लक्षावधी डॉलरचा चुना लावल्याप्रकरणी गेल्या वर्षी सीबीआयने व्हिडीओकॉन कंपनीचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांच्यासह कॉन्सोट्रियमच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरूद्ध सीबीआयने गेल्या वर्षी एफआयआर दाखल केला होता. मोझाम्बिक तेल क्षेत्रासाठी व्हिडीओकॉन कंपनीने लंडनमध्ये स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून कर्ज घेतले. मोझाम्बिक तेल क्षेत्राच्या बदल्यात एसबीआयच्या नेतृत्वातील बँक कॉन्सोट्रियमने या कर्जाची परतफेड केली. मात्र कॉन्सोट्रियमने मोझाम्बिक तेल क्षेत्राचा ताबा घेतला नाही. त्यामुळे स्टँडर्ड चार्टर्ड बँकेकडून या तेल क्षेत्रावर व्हिडीओकॉनला क्रेडिट सुविधा सुरूच राहील.

शेवटी हे तेल क्षेत्र ओएनजीसी विदेश लि. आणि ऑइल इंडिया लिमिटेडला २०१४ मध्ये २,५१९ दशलक्ष डॉलर्ला विकण्यात आले.  अधिग्रहणानंतर डिसेंबर २०१३ पर्यंत व्हिडीओकॉनने मोझाम्बिक, इंडोनेशिया आणि ब्राझील गॅस आणि तेल क्षेत्रावर अनुक्रमे ३७४ दशलक्ष डॉलर, ५५४.८३ दशलक्ष डॉलर आणि २५.२५ दशलक्ष डॉलर खर्च केले. मात्र व्हिडीओकॉनला १,६१६ दशलक्ष डॉलरची क्रेडिट सुविधा मिळाली. ही रक्कम व्हिडीओकॉनने कंपनी प्रवर्तकांच्या इतर खात्यात वळते केले किंवा अन्य हेतूसाठी वळवली असा सीबीआयचा आरोप आहे. त्याच प्रकरणात ईडीने ही छापेमारी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा