शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्या जालन्यातील घरावर ईडीची छापा, मराठवाड्यात खळबळ

0
937
संग्रहित छायाचित्र.

जालनाः मराठवाड्यातील शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज शुक्रवारी सकाळी छापेमारी केली. जालना येथील सहकारी साखर कारखाना विक्रीत अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच औरंगाबादेत पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यानंतर ही छापेमारी करण्यात आल्यामुळे मराठवाड्यात खळबळ उडाली आहे.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

ईडीच्या १२ अधिकाऱ्यांच्या पथकाने आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अर्जुन खोतकर यांच्या घरी छापा टाकला. त्यांच्या घराची झाडाझडती सुरू आहे. ईडीने छापा टाकला तेव्हा खोतकर हे घरीच होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन खोतकर यांचीही एका खोलीत चौकशी केली जात आहे. अर्जुन खोतकर हे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. ईडीच्या पथकाने कृषी उत्पन्न बाजार समितीचीही झाडाझडती सुरू केली असल्याची माहिती मिळते आहे.

हेही वाचाः फसवाफसवीः सेट परीक्षा उत्तीर्ण एसटी प्रवर्गातून, प्राध्यापकाची नोकरी मिळवली ओबीसी प्रवर्गातून

खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील रामनगर येथील सहकारी साखर कारखान्यात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन केला होता. या घोटाळ्याची तक्रार पुराव्यासह ईडी, प्राप्तिकर विभाग, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे केली असल्याचे सोमय्या म्हणाले होते. या घोटाळ्यात लवकरच कारवाई होईल, असा दावाही सोमय्या यांनी केला होता. आज झालेली ईडीची छापेमारी सोमय्यांच्या त्या दाव्याशी जोडून पाहिली जात आहे.

औरंगाबादेतही छापाः अर्जुन खोतकरांनी औरंगाबादेतील ज्या उद्योगपतीच्या  माध्यमातून हा शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता, त्या उद्योगपती/ व्यावसायिकाच्या औरंगाबादेतील निवासस्थानीही ईडीने छापेमारी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा