शिवसेना खासदार भावना गवळींच्या पाच संस्थांवर ईडीचे छापे, यवतमाळ- वाशिममध्ये खळबळ

0
754
संग्रहित छायाचित्र.

यवतमाळः राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या मागे सक्तवसुली संचालनालयाचा (ईडी) भुंगा लागलेला असतानाच त्यात आता यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांची भर पडली आहे. भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीने छापे टाकले आहेत. भाजप नेते किरिट सोमय्या यांच्या आरोपांनंतर ईडीने ही कारवाई केली असून सध्या पाचही संस्थांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.

 काही दिवसांपूर्वीच किरिट सोमय्या यांनी वाशिमचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी भावना गवळी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. भावना गवळी टीमने १०० कोटींची लूट नाही तर माफियागिरी चालवली आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. वाशिम जिल्ह्यातील देगाव, शिरपूर, रिसोडसह अन्य दोन ठिकाणी असलेल्या भावना गवळी यांच्या पाच संस्थांवर ईडीने छापेमारी केली आहे. त्यात उत्कर्ष प्रतिष्ठान, बालाजी सहकारी पार्टीकल बोर्ड, बीएमएस महाविद्यालय, भावना ऍग्रो प्रॉडक्ट सर्व्हिस लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. ईडीचे अधिकारी या संस्थांची कसून चौकशी करत असून कागदपत्रांची पडताळणी करत असल्याची माहिती समोर येत आहे.

७२ कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणी ईडीने खासदार भावना गवळी यांच्या पाच संस्थांशी संबंधित ९ ठिकाणी एकाच वेळी ही छापेमारी केली आहे. ईडीने छापेमारी केलेली ही नऊही ठिकाणे वाशिम जिल्ह्यातील असल्याची माहितीही समोर येत आहे. ईडीच्या या कारवाईमुळे यवतमाळ- वाशिम जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

भावना गवळी या विदर्भातील शिवसेनेच्या वजनदार नेत्या असून आजवर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून त्या  पाच वेळा निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे कालच ईडीने शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांना नोटीस पाठवली असून त्यांना ३१ ऑगस्ट रोजी मुंबई कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. परब यांना नोटीस बजावल्याच्या दुसऱ्याच दिवशी ईडीने शिवसेनेच्या आणखी एक नेत्या म्हणजेच भावना गवळी यांच्या संस्थांवर छापेमारी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा