राज्य सहकारी बँक घोटाळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवारांवर ईडीने दाखल केले गुन्हे

0
173

मुंबई: राज्य विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पेटू लागली असतानाच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांचे पुतणे व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तब्बल 70 राजकीय नेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. ईडीच्या या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण पेटण्याची शक्यता आहे.

 ईडीने गुन्हे दाखल केलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, विजयसिंह मोहिते पाटील, शिवाजीराव नलावडे, शेकापचे जयंत पाटील, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांचाही समावेश आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळात असलेल्या या नेत्यांवर नियमबाह्य कर्जवाटप केल्याचा आरोप ईडीकडून ठेवण्यात आला आहे.

 राज्य सहकारी बँकेचा हा कर्जवाटप घोटाळा 25 हजार कोटी रुपयांचा असल्याचा ईडीचा दावा आहे. राज्य सहकारी बँकेची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आले आणि  हे कर्जवाटप करताना मोठी अनियमितता करण्यात आली, असा ईडीचा ठपका आहे. कर्जवाटप करण्यात आलेले सहकारी साखर कारखाने काही राजकीय नेत्यांच्या जवळच्या नातेवाईकांना विकल्या गेल्याचाही ईडीचा दावा आहे. मनमानी कर्जवाटपामुळे राज्य सहकारी बँकेचे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात 2001 मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले. त्यानंतर चौकशीचेही आदेश दिले होते.

भाजपकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांची कोंडी करण्यासाठी ईडी, सीबीआयसारख्या तपास संस्थांचा दुरूपयोग केला जात असल्याचा आरोप होत असतानाच राज्य विधानसभेची निवडणूक जाहीर होताच ईडीने हे गुन्हे दाखल केल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. ईडीच्या चौकशीची भीती दाखवून काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेते भाजपने आपल्या पक्षात घेतल्याचा आरोप स्वतः शरद पवारांनीच केला होता.

गुन्हा दाखल झाला असेल तर स्वागतच : शरद पवार

 राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केल्याची मला माहिती नाही. असा गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर मी त्याचे स्वागतच करतो. मी कधीही कुठल्याही बँकेच्या संचालक पदावर नव्हतो. माझ्या दौर्‍यांना मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळेच ही कारवाई करण्याची वेळ आली असावी, अशी उपरोधिक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घडामोडीनंतर दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा