परमबीर सिंहांचीही ईडी करणार चौकशी, समन्स मिळताच पुढे केले प्रकृतीचे कारण!

0
63
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपये वसुलीचा आरोप करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे आणि देशमुखांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हेही सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) रडावर आहेत. शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाशी निगडित मनी लाँडरिंग प्रकरणात ईडी त्यांची चौकशी करून जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. मात्र ईडीचे समन्स मिळताच परमबीर सिंह यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून वेळ मागून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परमबीर सिंह यांना गेल्याच आठवड्यात ईडीने समन्स बजावून चौकशीसाठी तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगितले होते. मात्र परमबीर सिंह यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून जबाब नोंदवण्यासाठी वेळ मागून घेतला होता. आपल्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे कारणही परमबीर सिंह यांनी ईडीला दिले.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाशेजारी स्फोटकांसह आढळलेल्या स्कार्पिओ कारप्रकरणी परमबीर सिंहांवर अकार्यक्षमतेचा ठपका ठेवून त्यांची मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून बदली करण्यात आल्यानंतर परमबीर सिंहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.

परमबीर सिंहांच्या या लेटरबॉम्बनंतर या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करणाऱ्या अनेक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाल्या. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हाही दाखल केला. देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी छापे टाकून सीबीआय आणि ईडीने सर्च ऑपरेशनही केले होते. मात्र या चौकशीच्या फेऱ्यात परमबीर सिंह कुठेच दिसत नव्हते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा