शाळांना आता पाचऐवजी १४ दिवसांच्या दिवाळी सुट्या, शिक्षण विभागाने फिरवला आधीचा निर्णय

0
190
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः शाळांना दिवाळीच्या पाचच दिवसांच्या सुट्या देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने अकेर मागे घेतला असून आता उद्यापासून १४ दिवसांच्या दिवाळी सुट्या जाहीर केल्या आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

शिक्षण विभागाने पाच नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानुसार शाळांना १२ ते १६ नोव्हेंबर असे पाचच दिवस दिवाळीच्या सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामुळे  विद्यार्थी- शिक्षकांचा चांगलाच हिरमोड झाला होता. दिवाळीच्या सुट्या वाढवण्याची मागणी करण्यात आल्यानंतर आज शिक्षण विभागाने नवा आदेश जारी केला असून त्यानुसार ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर असे १४ दिवस दिवाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

कोरोना काळात शाळा सुरू नव्हत्या. पण ऑनलाइन वर्ग चालू होते. शिक्षकांना या ऑनलाइन वर्गांबरोबरच ‘कोरोना’च्या कामांची अतिरिक्त जबाबदारीही होती. ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या मानसिक स्वास्थ्यावरही परिणाम होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर गायकवाड यांनी सुटीचा कालावधी वढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मे महिन्यात दहावी, बारावीची परीक्षाः कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती लक्षात घेता  यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यापूर्वी घेणे शक्य नसल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे पावसाळ्याचे महिने आहेत. त्यामुळे आम्ही मे महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सप्टेंबर म्हटले की निकाल येण्यास उशीर होईल आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. आम्ही मंत्रिमंडळ बैठकीत शाळा सुरु करण्याबाबत आणि दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत प्रस्ताव ठेवला आहे.  मंत्रिमंडळ बैठकीतही या मुद्द्यावर चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेणार आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.

२३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्गः नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली तर या चार इयत्तांचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू केले जातील, असेही गायकवाड यांनी सांगितले.राज्यात टप्प्याटप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगानेच नववी, दहावी, अकरावी व बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरु झाल्यास दहावी आणि बारावीच्या परीक्षा मे महिन्यात घेण्याचा प्रयत्न करता येईल. हे विद्यार्थी वयाने मोठी आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्स, मास्कचे नियम पाळले जातील, असे गायकवाड म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा