कोरोना फैलावल्यानंतर निवडणूक आयोगाचे डोळे उघडलेः मतमोजणीनंतर विजयी मिरवणुकांवर बंदी!

0
271
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः कोरोना दुसऱ्या लाटेला तुम्हीच जबाबदार आहात, तुमच्यावर तर सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा दाखल करायला हवा, अशा कठोर शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने झापल्यानंतर भारताच्या निवडणूक आयोगाचे डोळे खाडकन उघडले असून आता २ मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी मिरवणुका काढण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे विजयी उमेदवार किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला विजयाचा जल्लोष करता येणार नाही.

एकीकडे देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपुढे हतबल झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांना बेड्स, ऑक्सीजन मिळणे दुरापास्त झाले आहे. आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याचे चित्र आहे. देशापुढे कोरोना संसर्गाचा धोका असतानाच निवडणूक आयोगाने पाच राज्यात निवडणुका जाहीर केल्या. राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारसभांमध्ये हजारोंच्या संख्येने लोक विनामास्क सहभागी झाले. निवडणूक प्रचारादरम्यान कोरोना नियमावली अक्षरशः पायदळी तुडवण्यात आली. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग जोमाने फैलावत चालला आहे.

तामीळनाडूचे परिवहनमंत्री आणि अण्णा द्रमुकचे उमेदवार एम. आर. विजयभास्कर यांनी २ मे रोजी होणाऱ्या मतमोजणी दरम्यान कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन व्हावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेस निवडणूक आयोगच जबाबदार आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच दाखल करायला हवा, अशा कठोर शब्दांत निवडणूक आयोगाला फटकारले होते.

मतमोजणीच्या दिवशी कोरोना नियमावलीचे पालन कसे केले जाणार आहे, याची ब्लू प्रिंट सादर करण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला काल सोमवारीच दिले होते. कोरोना नियमावलीचे पालन होणार नसेल तर मतमोजणी रोखायलाही आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा सज्जड दमही मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजीव बॅनर्जी आणि न्या. एस. राममूर्ती यांनी दिल्यानंतर आता कुठे निवडणूक आयोगाचे डोळे उघडले आहेत.

मतमोजणी झाल्यानंतर या दिवशी किंवा नंतरही विजयी उमेदवार किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने विजयी मिरवणुका काढण्यावर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. त्यामुळे आता निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षांना जल्लोष करता येणार नाही. निवडणूक आयोगाने ही बंदी आणली असली तरी आता राजकीय पक्ष, त्यांचे उमेदवार आणि कार्यकर्ते निवडणूक आयोगाची ही बंदी कितपत मानतात, हे पाहणेही महत्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा