आयोगाला उपरती : विधानसभेसोबतच होणार सातारा लोकसभेची पोटनिवडणूक

0
172

नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा करताना सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करणे टाळणाऱ्या निवडणूक आयोगावर टिकेची झोड उठल्यानंतर आता उपरती झाली आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी साताऱ्याच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे ही निवडणूक विधानसभा निवडणुकीसोबतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागच्या शनिवारी महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना केंद्रीय निवडणूक आयोगाने 18 राज्यातील लोकसभेच्या 64 मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर केला होता. परंतु खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपत गेल्यामुळे रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला नव्हता. त्यामुळे निवडणूक आयोगावर टिकेची झोडही उठली होती. उदयनराजे भोसलेंच्या सोयीसाठीच ही पोटनिवडणूक नंतर घेण्याचा डाव असल्याचेही बोलले जात होते. मात्र मंगळवारी निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार साताऱ्याच्या पोटनिवडणुकीसाठी विधानसभेसोबतच म्हणजे 21 ऑक्टोबरला मतदान आणि 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

अनेक नेते सोडून गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार वयाच्या ऐंशीत स्वतःच मैदानात उतरले आहेत. त्यांना उभा महाराष्ट्र पिंजून काढत राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेला एकही आमदार किंवा नेता पुन्हा कोणत्याही निवडणुकीत निवडून येणार नाही, अशी व्यवस्था करून ठेवल्याचे वारंवार सांगितल्यामुळे सातारा लोकसभेची पोटनिवडणूक चुरशीची आणि उदयनराजे भोसले यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीने महत्वाची ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा