ग्रामपंचायत निवडणुका जाहीरः राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान

0
389
प्रातििनिधिक छायाचित्र.

मुंबईः कोरोना संसर्गामुळे लांबवणीवर पडलेल्या राज्यातील ३४ जिल्ह्यांतील मुदत संपलेल्या १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार असून १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. आजपासूनच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी केली.

एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या राज्यातील १ हजार ५६६ ग्रामपंचायतींसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होते. परंतु कोरोना संसर्गामुळे १७ मार्च रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णतः रद्द करण्यात आला होता. या ग्रामपंचायतींसोबत डिसेंबरअखेरपर्यंत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याचे मदान यांनी सांगितले.

या निवडणुकांसाठी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. सरकारी सुटीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाईल. ४ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी म्हणजे ४ जानेवारी २०२१ रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप जाईल.  १५ जानेवारी २०१२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान घेण्यात येईल फक्त गडचिरोली जिल्ह्यात मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल. १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी करण्यात येईल.

निवडणूक होणाऱ्या जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या अशीः

  • औरंगाबादः ६१८
  • नांदेडः १०१५
  • उस्मानाबादः ४२८
  • बीडः १२९
  • परभणीः ५६६
  • जालनाः ४७५
  • लातूरः ४०८
  • हिंगोलीः ४९५
  • बुलडाणाः ५२७
  • चंद्रपूरः ६२९
  • नागपूरः १३०
  • अकोलाः २२५
  • अमरावतीः५५३
  • यवतमाळः ९८०
  • वाशिमः १६३
  • भंडाराः १४८
  • वर्धाः ५०
  • गोंदियाः १८९
  • गडचिरोलीः ३६२
  • जळगावः७८३
  • अहमदनगरः ७६७
  • पुणेः ७४८
  • सोलापूरः६५८
  • साताराः ८७९
  • सांगलीः १५२
  • कोल्हापूरः ४३३
  • नाशिकः ६२१
  • धुळेः१२८
  • ठाणेः १५८
  • रायगडः८८
  • पालघरः ३
  • सिंधुदुर्गः ७०
  • रत्नागिरीः ४७९
  • नंदूरबारः ८७

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा