‘तेल लावलेले पहिलवान’विरुद्ध भाजपचा सामनाः विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर!

0
1684
संग्रहित छायाचित्र.

मुंबई: विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नेमणुकांचा तिढा कायम असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘कोरोना’मुळे लांबणीवर पडलेल्या विधानपरिषदेतील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघातील तीन जागा, तर अमरावती व पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघातील दोन जागांसाठी या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या मतदारसंघात येत्या १ डिसेंबर  रोजी मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. या पाचही मतदारसंघात सोमवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा पहिलाच सामना रंगणार असल्याने या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानपरिषदेवरील पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील पाच सदस्यांचा कार्यकाळ १९ जुलै रोजी संपला होता. त्यांचा कार्यकाळ संपून तीन महिने ओलांडले आहेत. परंतु ‘कोरोना’ आपत्तीमुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता मात्र १ डिसेंबर रोजी या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या पाच जागांवर अनुक्रमे सतीश चव्हाण (औरंगाबाद), चंद्रकांत  पाटील (पुणे), अनिल सोले (नागपूर) हे तीन पदवीधर मतदारसंघातील तर श्रीकांत देशपांडे (अमरावती) व दत्तात्रय सावंत (पुणे) हे शिक्षक मतदारसंघातील आमदार म्हणून कार्यरत होते. भाजपचे चंद्रकांत पाटील हे विधानसभेवर यापूर्वीच निवडून आले होते. त्यामुळे त्यांची विधानपरिषदेतील जागाही यापूर्वीच रिक्त झालेली आहे.

हेही वाचाः ‘विधान परिषदेवरील १२ सदस्यांची यादी राज्यपाल बाजूला ठेवणार, फडणवीसांशी चर्चेत आधीच ठरले!’

राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपने आपला झेंडा फडकावल्यामुळे विधानपरिषदेत भाजपचे वजन वाढले आहे. मात्र, आता राज्यात भाजपची सत्ता गेल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले असल्याने या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा समीकरण बदलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असले तरी महाविकास आघाडीची एकत्रित ताकद विरुद्ध भाजप असा सामना पाहायला मिळणार आहे.

एकीकडे  विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीचा तिढा कायम असतानाच विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्याने राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. राज्यावर कोरोना साथीचे संकट ओढवल्यानंतर सर्वच निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता कोरोनाची साथ काही प्रमाणात नियंत्रणात येत असतानाच राज्यातील ही पहिलीच निवडणूक असून या निमित्ताने महाविकास आघाडीविरुद्ध भाजप असा पहिलाच जंगी सामना रंगणार असून तेल लावलेले पहिलवानविरुद्ध सत्ता गेल्यामुळे हिरमुसलेले पहिलवान अशी लढत पहायला मिळणार आहे.

तिन्ही पक्ष एकत्र लढले तर भाजपला डिपॉझिट वाचवणेही अवघड?: पदवीधरच्या तीनपैकी दोन जागा सध्या भाजपकडे असून भाजपपुढे या जागा राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. भाजपची सत्ता गेल्यामुळे राज्यातील राजकारणाचा कलही बदललेला दिसू लागला आहे. त्याचवेळी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष या पाच जागा एकत्रितपणे लढणार का?, एकत्रित लढणार असतील तर जागांचे वाटप कसे होणार? हे महत्वाचे प्रश्न असून तिन्ही पक्ष एकत्रित लढले तर भाजपला आपल्या उमेदवारांचे डिपॉझिट वाचवणेही अवघड होऊन बसेल, असे जाणकरांना वाटते.

निवडणूक कार्यक्रम असा:

  • ५ नोव्हेंबरः अधिसूचना जारी होणार.
  • १२ नोव्हेंबरः उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख.
  • १३ नोव्हेंबरः उमेदवारी अर्जांची छानणी.
  • १७ नोव्हेंबरः उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस
  • १ डिसेंबरः सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान.
  • ३ डिसेंबरः मतमोजणी
  • ७ डिसेंबरः निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा