वीज कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मंगळवारी मंत्रालयात बैठक, वीज कंपन्यांचे खासगीकरण नाही: डॉ. राऊत

0
39
संग्रहित छायाचित्र.

नागपूर: राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचे खासगीकरण होऊ देणार नाही. वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी उद्या मंगळवारी दुपारी २ वाजता मंत्रालयातील दालनात प्रत्यक्ष बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करण्यात येईल. प्रस्तावित संप मागे घ्यावा, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी वीज कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केले आहे.

या आवाहनाला प्रतिसाद देऊन वीज कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी उद्या होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहून चर्चा करण्याला मान्यता दिली. या चर्चेतून निश्चितपणे तोडगा निघून वीज कर्मचारी संप मागे घेतील, असा विश्वास ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी व्यक्त केला.

वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी संपाचा इशारा देणाऱ्या २७ वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीदरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

सध्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. शेतात शेतकऱ्यांची पिके उभी आहेत. त्यातच उष्णतेचा प्रकोपही वाढत चालला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा करण्याची माझी तयारी आहे. कुठल्याही गोष्टीवर संवाद व चर्चेतूनच मार्ग निघतो, असे राऊत म्हणाले.

चला उद्योजक बनाः  स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

 उद्या मंत्रालयात दुपारी २ वाजता बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीला हजर रहावे आणि संप मागे घ्यावा, असे आवाहन डॉ.राऊत यांनी केले.  ऊर्जामंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी उद्या होणाऱ्या बैठकीला हजर राहून चर्चा करण्यास तयारी दर्शविली. आता या बैठकीतून काय तोडगा निघतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

राज्याला वेठीस धरू नकाः वीजेची मागणी सातत्याने वाढत आहे. २७ हजार मेगावॅटच्या वर वीजेची मागणी गेली आहे. दुसरीकडे इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभं पीक आहे. त्यांना मदत करावी म्हणून विधानसभेत आपण त्यांना तीन महिन्यांची सवलत दिल्याचे जाहीर केले आहे. महावितरणही आर्थिक संकटात आहे. आर्थिक संकटात असूनही राज्यातील नागरिकांची सेवा करण्याचा संकल्प महावितरणने केला आहे. अशा अत्यंत विपरित परिस्थितीत आपण राज्याला वेठीस धरू नये आणि संप मागे घ्यावा, अशी विनंती मी केली आहे, असे राऊत यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा