कोरोनाची दुसरी लाटः इंग्लंडमध्ये पुन्हा महिनाभराचा कडक लॉकडाऊन

0
628
संग्रहित छायाचित्र.

इंग्लंडः कठोर पावले उचलल्याशिवाय कोरोनाची दुसरी लाट थोपवता येऊ शकणार नाही आणि तशी पावले उचली नाही तर आठवडाभरात रुग्णालयातही जागा शिल्लक राहणार नाही, असा इशारा देण्यात आल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी इंग्लंडमध्ये महिनाभराचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. गुरूवारपासून लागू होणारा हा लॉकडाऊन २ डिसेंबरपर्यंत राहील.

ब्रिटनमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे दैनंदिन व्यवहार आणि व्यापारावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोणताही जबाबदार पंतप्रधान कोरोना बाधित रुग्णसंख्येकडे दुर्लक्ष करू शकत नाही, असे जॉनसन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

 आपण जर पावले उचलली नाहीत तर आपल्या देशात आपणाला दररोज हजारो लोकांचे मृत्यू पहावे लागतील, असे जॉनसन म्हणाले. जॉनसन यांनाही कोरोनाची बाधा झाली होती आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

नवीन निर्बंधांनुसार बार आणि रेस्टॉरंट्समधून फक्त पार्सल सुविधा असेल. अनावश्यक दुकाने बंद राहतील. लोकांना व्यायामासह ठरवून दिलेल्या कारणांसाठीच घराबाहेर पडता येईल. हेअर सलून बंद राहतील आणि परदेशी प्रवासावर निर्बंध असतील.

 ब्रिटनमध्ये आधी तीन महिन्यांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यावेळी शाळा, विदयापीठे, बांधकाम साइट्स आणि मॅन्युफॅक्चरिंग उद्योग बंद ठेवण्यात आले होते. या लॉकडाऊनमध्ये मात्र ते खुले राहणार आहेत. अन्य युरोपीयन देशांप्रमाणेच ब्रिटनमध्येही लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आणि लोक कार्यालये, शाळा, विद्यापीठे, सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ लागल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढली आहे.

प्रादेशिक निर्बंधांमुळे कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणली जाऊ शकेल, अशी अपेक्षा जॉनसन यांनी व्यक्त केली असली तरी कोरोना बाधितांच्या संख्येत सध्या होणारी वाढ लक्षात घेता कोरोनाच्या पहिल्या लाटेत उघडण्यात आलेली तात्पुरती रुग्णालये पुन्हा सुरु केली तरी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णालयांच्या क्षमतेपेक्षा बेड्सची मागणी वाढू शकते, असा अंदाज वैज्ञानिक सल्लागाराने व्यक्त केला आहे.

 अधिकृत आकडेवारीनुसार शनिवारी लंडनमध्ये अवघ्या २४ तासांत २१ हजार ९१५ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे ब्रिटनमधील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १० लाख ११ हजार ६६० वर पोहोचली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाने ४६ हजार ५५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपीय देशातील हा मृतांचा आकडा सर्वाधिक आहे.

भारतात २४ तासांत ४६ हजार ९६३ नवे रुग्णः दरम्यान, भारतात गेल्या २४ तासांत ४६ हजार ९६३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ४७० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८१ लाख ८४ हजार ८२ वर पोहोचली आहे. तर १ लाख २२ हजार १११ जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी  ७४ लाख ९१ हजार ५१३ जणांनी कोरोनावर मात केली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा