महाराष्ट्रात मनोरंजन क्षेत्राला मिळणार उद्योगाचा दर्जा, लवकरच नवे धोरण!

0
76
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची निर्मिती संख्या लक्षात घेता मनोरंजन क्षेत्रासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत नवे धोरण निश्चित करण्यात येणार असून मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्यात येईल, असे सूतोवाच सांस्कृतिककार्य मंत्री अमित देशमुख यांनी केले.

दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या (फिल्मसिटी) संचालक मंडळाची बैठक गुरूवारी मंत्रालयात झाली. नव्या धोरणात चित्रपट, मालिका, ओटीटी यांच्यासह रंगमंच, लोककला, माहितीपट, जाहिरातपट यांचा समावेश केला जाईल. दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत या धोरणाचे प्रारुप तयार करण्यात यावे, असेही देशमुख यांनी सांगितले.

धोरणाचे प्रारुप सांस्कृतिककार्य विभागाला सादर केल्यानंतर हे धोरण मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येईल. मनोरंजन क्षेत्रामुळे अनेकांना रोजगार मिळत असल्याने या क्षेत्रास उद्योग क्षेत्राचा दर्जा मिळण्याबरोबरच लघु आणि मध्यम उद्योगांना मिळणाऱ्या सवलती मिळणे आवश्यक आहे. या क्षेत्रास उद्योग क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठीही सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

चित्रनगरीसाठी तांत्रिक आणि कुशल मनुष्यबळ यांची नियुक्ती आणि पॅनेल तयार करणे, सलग चित्रिकरण करणाऱ्या निर्मात्यांना चित्रिकरण दरात सवलत देणे, चित्रनगरी येथे मुख्य सुरक्षा कार्यकारी अधिकाऱ्यांची नेमणूक करणे, उपहारगृह सुरु करणे, वेगवेगळया अभ्यासक्रमासाठी इंटर्नशिप सुरु करणे, चित्रनगरीच्या भाडे सवलती पध्दतीत सुधारणा करणे आणि चित्रनगरीचे उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे अशा विविध मुद्यांवर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

पुणे, नाशिकमध्येही एक खिडकी योजनाः सध्या मुंबई आणि मुंबई उपनगरात चित्रिकरणाच्या परवानगीसाठी एक खिडकी योजना राबवण्यात येत असून दुसऱ्या टप्प्यात ही योजना पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा सहा जिल्हयात राबवण्यात येणार असून तिसऱ्या टप्प्यात ही योजना उर्वरित जिल्हयांत राबवण्यात येणार आहे. एक खिडकी योजनेचे विस्तारीकरण करण्यात येत असताना यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या परवानगी एकाच ठिकाणी देता येतील का याबाबत अभ्यास करण्यात यावा. महाराष्ट्रातील पर्यटकांनाही माहित नसलेली तरीही प्रसिध्द असलेल्या पर्यटनस्थळांचाही यामध्ये समावेश करण्यात यावा,अशा सूचना देशमुख यांनी केल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा