पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्याचे बँक खाते सील, कर्मचाऱ्यांच्या पीएफच्या ९२ लाखांची वसुली

0
793
संग्रहित छायाचित्र.

बीडः भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या चेअरमन असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करण्यात आले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) औरंगाबाद विभागीय कार्यालयाने ही कारवाई केली. बँक खाते सील करून कर्मचाऱ्यांच्या पीएफपोटी थकीत असलेली ९२ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील पांगरी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे. पंकजा मुंडे या कारखान्याच्या चेअरमन आहेत. पीएफ थकबाकीदारांविरुद्धची ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने कर्मचारी- कामगारांच्या पीएफची रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नव्हती. ही रक्कम तब्बल १ कोटी ४६ लाख रुपये आहे.

कर्मचारी- कामगारांच्या पीएफची ही थकबाकी वसूल करण्यासाठी सहायक आयुक्त आदित्य तलवारे यांच्या आदेशानुसार प्रवर्तन अधिकारी एस. आर. वानखेडे यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बँक खाते सील करून पीएफच्या थकबाकीपोटी ९२ लाख रुपयांची रक्कम वसूल केली. उर्वरित ५६ लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठीही कारवाई सुरू करण्यात आल्याचे ईपीएफओ कार्यालयाने कळवले आहे. पीएफ थकबाकीदारांनी त्यांच्याकडील थकबाकीची रक्कम त्वरित भरावी, असे आवाहन ईपीएफओचे क्षेत्रिय आयुक्त जगदीश तांबे यांनी केले आहे.

कर्मचाऱ्यांचे पगारही थकीतः वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी- कामगारांच्या थकीत पगाराचा मुद्दा हा परळीच्या राजकारणात चर्चेचा राहिला आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळातही थकीत पगाराच्या मागणीसाठी कारखान्याच्या कामगारांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर उपोषण केले होते. त्यामुळे ऐननिवडणुकीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगार-कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा मुद्दा चर्चेत आला होता. आता पीएफ थकबाकीचा मुद्दा समोर आला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा