भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंकजा मुंडेंना विजया रहाटकरांइतकेच महत्व!

0
106

मुंबईः भाजपच्या फायरब्रँड नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय मंत्रिपदी समावेश करण्यात आला आहे. हा माझा सन्मानच असल्याचे सांगत पंकजा मुंडे यांनी आनंद व्यक्त केला आहे. दुसरीकडे याच राष्ट्रीय कार्यकारिणीत औरंगाबादच्या माजी महापौर आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांचीही राष्ट्रीय मंत्रिपदी वर्णी लावण्यात आली आहे. मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्याच्या मोठा जनाधार असलेल्या पंकजा मुंडेंना भाजपने पक्षात विजया रहाटकरांइतकेच महत्व दिले आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विजया रहाटकर, विनोद तावडे आणि सुनिल देवधर यांची राष्ट्रीय मंत्रिपदी वर्णी लावली आहे. नंदूरबारच्या भाजप खासदार हीना गावीत यांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रीय मंत्रिपदापेक्षा भाजपमध्ये राष्ट्रीय प्रवक्ता हे मोठे पद आहे.

पंकजा मुंडे यांची या कार्यकारिणीत वर्णी लागली असली तरी त्यांचे मामा आणि दिवंगत ज्येष्ठ भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला आहे. त्यांच्याकडील भाजप युवा मोर्चाची जबाबदारी काढून तेजस्वी सूर्या यांच्याकडे देण्यात आली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने तिकिट नाकारलेले विनोद तावडेही राष्ट्रीय मंत्री झाले आहेत. पक्षाने दिलेले काम करणारा मी कार्यकर्ता आहे, असे सांगत त्यांनी या पुनर्वसनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा पराभव झालेला असला तरी त्यांची ओळख भाजपच्या फायरब्रँड लोकनेत्या अशीच आहे. २००९ आणि २०१४ मध्ये त्या परळी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. फडणवीस सरकारमध्ये त्यांनी ग्रामविकास मंत्री म्हणूनही काम केले आहे. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्यात त्यांना मानणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांची मोठी फळी आहे. वंजारी समाजात त्यांचे पक्के बस्तान आहे. पक्ष बांधणीत त्यांचे लक्षणीय योगदान राहिले आहे. भाजपच्या राष्ट्रीय मंत्रिपदी लागलेली वर्णी हा माझा सन्मान आहे, असे पंकजांनी म्हटले आहे.

दुसरीकडे पंकजांच्या बरोबरीनेच भाजपच्या कार्यकारिणीत राष्ट्रीय मंत्रिपदी वर्णी लागलेल्या विजया रहाटकर २००० ते २०१० या काळात औरंगाबाद महानगरपालिकेच्या नगरसेवक, २००७ ते २०१० या काळात औरंगाबादच्या महापौर आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. पक्षात त्यांनी भाजप महिला मोर्चाचा सरचिटणीस आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय मंत्रिपदी वर्णी लागल्याबद्दल रहाटकर यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे मराठवाड्यातील दोन महिला एकाच वेळी बरोबरीचे स्थान घेऊन भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत गेल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा