भाजपचे जयसिंगराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला, सतीश चव्हाणांचा करणार प्रचार!

0
1419
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी अनेक वेगवान घडामोडी घडत असून भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा पूर्ण ताकदीनिशी प्रचार करणार असल्याचे आजच त्यांनी जाहीर करून टाकले आहे.

जयसिंगराव गायकवाड यांनी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी आधी त्यांनी भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या सदस्यत्वाचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. त्यानंतर ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात राहतील, असा अंदाज बांधला जात होता. परंतु तसे न होता ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागल्याचे स्पष्ट झाले.

गायकवाड यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या पराभवासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि या मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा पूर्ण ताकदीनिशी प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. गायकवाड हे या मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेले आहेत. त्यांचा जनसंपर्कही मोठा आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा