भाजप प्रवक्ते संबित पात्रा तोंडघशीः केजरीवालांच्या ‘त्या’ व्हिडीओत छेडछाड केल्याचा पर्दाफाश!

0
444

नवी दिल्लीः सत्याचा विपर्यास करून खोटे तेच कसे सत्य आहे, हे जनमानसावर बिंबवण्याचे भाजपचे टेक्निक पुन्हा एकदा उघडकीस आले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा हे त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवरून चांगलेच तोंडघशी पडले आहेत. ‘तीनो फार्म बिल्स के लाभ गिनाते हुए… सरजी…’ अशी कॅप्शन देऊन पात्रा यांनी शेअर केलेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचा हा व्हिडीओ मॅन्युप्युलेटेड म्हणजेच छेडछाड केल्याचा फ्लॅग खुद्द ट्विटरनेच पात्रा यांच्या या ट्विटवर लावला असून त्यामुळे त्यांची चांगलीच गोची झाली आहे.

संबित पात्रा यांनी शेअर केलेल्या या १८ सेकंदांच्या व्हिडीओत केजरीवाल ‘तुमची जमीन, हमीभाव आणि बाजार समित्या हिरावून घेतल्या जाणार नाहीत. आता शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही विकू शकतात. आता शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल. बाजार समितीच्या बाहेर शेतकरी आता कुठेही शेतमाल विकू शकतो. दिलीप जी, शेती क्षेत्रातील हे ७० वर्षांतील सर्वात मोठे क्रांतिकारी पाऊल ठरेल’, असे केजरीवाल या व्हिडीओत सांगताना दिसत आहेत.

संबित पात्रा यांनी ट्विटरवर शेअर केलेला अरविंद केजरीवाल यांचा हा व्हिडीओ १९.३ हजार लोकांनी रिट्विट केला आहे. २.७ हजार लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत तर ४९.३ हजार लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. विशेष म्हणजे दूरदर्शन न्यूजचे पत्रकार अशोक श्रीवास्त यांनीही हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.

मोदी सरकारचे तीन कृषी कायदे रद्द करावेत म्हणून गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली आहे. केजरीवालांच्या आम आदमी पक्षाने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला सक्रीय पाठिंबाही दिला आहे. एवढेच नव्हे तर गाझीपूर सीमेवर उत्तर प्रदेश सरकारने आंदोलकांचा पाणी आणि विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर केजरीवाल सरकार त्यांच्या मदतीला धावून गेले होते. अशातच भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी हा व्हिडीओ ट्विट करून कृषी कायद्यांबाबत केजरीवाल कसे दुटप्पी भूमिका घेत आहेत, हे भासवण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्यांचा हा प्रयत्न फसला आणि ते चांगलेच तोंडघशी पडले आहेत.

अल्टन्यूजने केलेल्या फॅक्टचेकमध्येही भाजपचे राष्ट्रीय प्रवक्तेपद भूषवत असलेल्या संबित पात्रांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. झी पंजाब हरयाणा हिमाचलने १५ जानेवारी २०२१ रोजी केजरीवाल यांचा हा पूर्ण व्हिडीओ अपलोड केला आहे. या वृत्तवाहिनीचे संपादक दिलीप तिवारी आणि त्यांचे सहकारी जगदीप संधू यांनी केजरीवाल यांची जी मुलाखत घेतली होती, तोच हा व्हिडीओ आहे.

अशी केली छेडछाड ( केजरीवालांची पूर्णवाक्ये न घेता १८ सेकंदाच्या व्हिडीओत घेतलेली सोयीची वाक्ये ठळक अक्षरात)

या व्हिडीओच्या प्रारंभीच ५.५५ मिनिटाला जगदीप संधू यांनी केजरीवाल यांना प्रश्न विचारला, ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असा दावा केंद्र सरकार करते’. यावर केजरीवाल उत्तर देतात, ‘कसे? केंद्र सरकार आणि भाजपने त्यांच्या मोठ्या नेत्यांना मैदानात उतरवले आहे. त्यांचे सर्व ज्येष्ठ मंत्री आणि मुख्यमंत्री हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्यांची सर्व भाषणे ऐकली. ते काय सांगत आहेत? ते म्हणतात की हे कायदे तुमची जमीन हिरावून घेणार नाहीत. पण हा काही फायदा नाही. जमीन शेतकऱ्यांचीच आहे. तुमची एमएसपी हिरावून घेतली जाणार नाही. हाही काही फायदा नाही. तुमच्या बाजार समित्या हिरावून घेतल्या जाणार नाहीत. आणि त्या तर अस्तित्वात आहेतच. मग काय घडणार?  त्यांचा एकही नेता फायदे सांगू शकत नाही. त्यांना आणखी विचारले तर ते सांगतात की, शेतकरी आता त्यांचा शेतमाल देशात कुठेही विकू शकतात. हाच काय तो ते फायदा सांगतात. बरोबर?’ आता शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल. तो शेतमाल बाजार समितीच्या बाहेर कुठेही विकू शकतो. मी केंद्राचा आदर ठेवून थेट विचारू इच्छितो की, आज पंजाब आणि हरियाणाच्या बाजार समित्यांत गव्हाचा हमीभाव १८०० रुपये प्रतिक्विंटल आहे. बिहारमध्ये बाजार समित्या नाहीत, तेथे शेतकऱ्यांना गहू ८०० रुपये क्विंटल विकावा लागत आहे. तो जो शेतकरी ८०० रुपयांत विकत आहे, त्याला बाजार समित्यांच्या बाहेर जाऊन १८०० रुपयांपेक्षा जास्त भाव कुठे मिळेल, त्याला हे तुम्ही सांगू शकता का?

याच व्हिडीओत ९.४८ मिनिटांना अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना केजरीवाल म्हणतात की, हे तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजे आणि शेतमालाला एमएसपीची हमी देणारा कायदा आणला पाहिजे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार जेवढा खर्च आहे त्याच्या ५० टक्के मिळवून ५० टक्के नफ्याच्या हिशेबाने हमीभाव तयार केला गेला पाहिजे. तर तसे झाले तर दिलीप जी, कृषी क्षेत्रातील हे ७० वर्षांतील क्रांतीकारी पाऊल ठरेल.

अल्टन्यूजच्या फॅक्टचेकमध्ये ही वस्तुस्थिती समोर आली आहे. अरविंद केजरीवाल हे कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ बोलत आहेत, हे दाखवण्यासाठी या मुलाखतीतील छोटी छोटी वाक्ये एकत्र करून १८ सेकंदांची क्लिप तयार करण्यात आली आहे. यापूर्वीही अल्टन्यूजने संबित पात्रा यांचा खोटारडेपणा उघड केला असून त्यांचे १८ दावे खोडून काढले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा