मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची खोटी सुसाईड नोट बनवली, बीडमध्ये अज्ञातांविरूद्ध गुन्हा

0
891
संग्रहित छायाचित्र.

बीडः  बीड जिल्ह्यातील विवेक कल्याण रहाडे या युवकाच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. विवेकने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची खोटी सुसाईड नोट तयार करून ती व्हायरल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली असून या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बीड जिल्ह्यातील केतुरा येथील विवेक कल्याण रहाडे या १८ वर्षीय युवकाने ३० सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याने पंधरा दिवसांपूर्वीच वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षाही दिली होती. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्यामुळेच विवेकने आत्महत्या केल्याची सुसाईड नोट व्हायरल करण्यात आली होती. त्यामुळे समाजातून संतप्त भावनाही व्यक्त झाल्या होत्या.

विवेकच्या रजिस्टरमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये ‘ मी विवेक कल्याण रहाडे एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मी आत्ताच नीट ही मेडिकलची परीक्षा दिली आहे. माझा नीटमध्ये मराठा आरक्षण गेल्यामुळे नंबर लागत नाही. माझ्या घरच्यांची मला प्रायव्हेटमध्ये शिकवण्याची ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आविष्य (आयुष्य) संपवत आहे. मी मेल्यानंतर तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मराठ्यांच्या मुलांची किव येईल आणि माझे मरण सार्थकी होईल,’ असा मजकूर लिहिण्यात आला होता.

 विशेष म्हणजे विवेकच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी जेव्हा पंचनामा केला होता, तेव्हा कोणत्याही प्रकारची चिठ्ठी अथवा सुसाईड नोट आढळून आली नव्हती. नंतर मात्र त्याच्या रजिस्टरमध्ये हा मजकूर लिहिल्याचे आढळून आले होते. पोलिसांना या प्रकाराचा संशय आल्यानंतर पोलिसांनी विवेकचे मूळ हस्ताक्षर असलेले रजिस्टर आणि या सुसाईड नोटचा मजकूर लिहिलेल्या हस्ताक्षराची औरंगाबादच्या अतिरिक्त मुख्य शासकीय परीक्षकामार्फत तपासणी करून घेतली असता विवेकचे मूळ हस्ताक्षर आणि सुसाईड नोटचे हस्ताक्षर यात ताळमेळ बसत नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

हा अहवालानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भादंविच्या कलम ४६५, ४७१, ५०५(ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कपटीपणाने आणि अप्रामाणिकपणे खोटा दस्तऐवज तयार करून तो खरा असल्याचे भासवून मराठा समाजातील व्यक्तींमध्ये राज्य व केंद्र सरकारविरुद्ध रोष निर्माण होईल, हे माहीत असतानाही सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने संगनमताने खोटा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

 पोलिस उपनिरीक्षक सुरेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक सुजीत बडे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत. विवेकच्या रजिस्टरमध्ये ही खोटी सुसाईड नोट कुणी लिहिली, याचा शोध आता पोलिस घेत असून येत्या दोन-तीन दिवसांत आरोपींचा माग लागण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा