‘पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायचा मळा’,‘हे खरंच आहे खरं,’चे गीतकार हरेंद्र जाधव यांचे निधन

0
451
संग्रहित छायाचित्र.

मुंबई ‘पहा पहा मंजुळा हा माझ्या भीमरायाचा मळा…’ आणि ‘हे खरंच आहे खरं श्री भिमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर’, अशी एकापेक्षा एक सरस भीमगीते लिहून मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे आणि आंबेडकरी चळवळीची पताका महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचवणारे प्रसिद्ध गीतकार, जलसाकार, लोककवि हरेंद्र जाधव यांचे शनिवारी रात्री निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हरेंद्र जाधव यांना काही वर्षांपूर्वी पक्षाघाताचा झटका आला होता. त्यामुळे ते अंथरुणावरच होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नसायची. शनिवारी रात्री त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि  रात्री ११.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

हरेंद्र जाधव यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९३३ रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला होता. हरेंद्र जाधव हे पेशाने शिक्षक होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन ते समाजकार्यात ओढले गेले. त्यावेळी जलसा मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केले जात होते. जाधव यांनाही लिहिण्याची गोडी लागली आणि त्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून अनेक बहारदार गाणी उतरली. वयाच्या १७ व्या वर्षीच त्यांनी पहिले गाणे लिहिले होते. मात्र, हे गाणे रेकॉर्ड करण्यासाठी त्यांना तब्बल दहा वर्षे वाट पहावी लागली होती.

शाहीर हरेंद्र जाधव यांनी दहा हजाराहून अधिक गीते लिहिली. त्यांनी आयुष्यातील ६० वर्षाहून अधिकचा काळ कलेच्य माध्यमातून समाजप्रबोधनासाठी खर्च केला आहे. जनसामान्याचा मनातील भाव, त्यांच्या व्यथा अचूक ओळखून त्यांनी आपल्या गीतांची रचना केल्यामुळे ते महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील समाजबांधवांपर्यंत समजप्रबोधनात्मक विचार पोहोचविण्यात यशस्वी झाले. फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारांची मशाल त्यानी नेहमीच आपल्या लिखाणामधून धगधगत ठेवली. आणि म्हणूनच आजही ‘पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा’,  ‘हे खरंच आहे खरं श्री भिमराव रामजी आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर नाव हे गाजतंय हो जगभर’, ‘हे जयंती दिना ही तुला प्रार्थना होऊ हे या दिनी भीम जन्म पुन्हा’, ही त्यांची गाजलेली आणि आजही आंबेडकरी जनतेच्या ओठावर असलेली काही प्रसिद्ध भीमगीते आहेत.

हरेंद्र जाधव यांनी लिहिलेली काही पुस्तकेः

  • गीत भीमायनः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित काव्यग्रंथ.
  • गीत रमायनः मातोश्री रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित काव्यग्रंथ.
  • संसार माझा आंबेडकरीः काव्यग्रंथ.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा