औरंगाबादकरांना ‘स्मार्ट’ चटकाः सिटी बसच्या प्रवास भाड्यात ७ ते ९ टक्के वाढ

0
40
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः कोरोना संसर्गामुळे तब्बल सात महिने बंद ठेवण्यात आलेली सिटी बससेवा ५ नोव्हेंबरपासून पुन्हा औरंगाबादकरांच्या सेवेत रुजू होत असली तरी तिकिट दरांत ७ ते ९ टक्के वाढ करण्यात आल्यामुळे पहिल्या दिवसापासूनच औरंगाबादकरांना जास्तीचे प्रवासभाडे मोजावे लागणार आहे. ही भाडेवाढ अत्यल्प तर आहेच, शिवाय राज्यात सर्वात कमी प्रवासभाडे औरंगाबादेतच आहे, असा दावा स्मार्ट सिटीच्या सिटी बस विभागाचे मुख्य व्यवस्थापक प्रशांत भुसारी यांनी केला आहे.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात जानेवारी २०१९ मध्ये सिटी बससेवा सुरु करण्यात आली आहे. सिटी बसच्या ताफ्यात एकूण १०० बसेस आहेत. मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला आणि या बस सेवेला ब्रेक लागला. संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून ही सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. आता ५ नोव्हेंबरपासून ही सेवा पुन्हा सुरू होत आहे. त्यासाठी सिटी बसच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण तयारी केली आहे. नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणि वैशिष्ट्यांसोबत ही सेवा सुरू होत आहे. पण सोबतच आता बस सेवेचे प्रवासी भाडेही बदलले आहे. काही मार्गांवर प्रवास भाड्यात ७ ते ९ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे.

सिटी बसच्या प्रवासभाडेवाढीसाठी इंधनाची दरवाढ, कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर पूरक खर्चांत झालेली वाढ अशी कारणे देण्यात आली आहेत. डिझेलच्या दरात लिटरमागे १६.५१ रूपयांची वाढ झाली आहे. डिझेलच्या खर्चातील ही वाढ २८ टक्के इतकी आहे. त्यामुळे सिटी बसच्या एका किलोमिटरच्या खर्चात जानेवारी २०१९ च्या तुलनेत ३.४२ रुपये वाढ झाली आहे. इंधन दरवाढीमुळे एकूण कामकाजाच्या खर्चात ७.६१ टक्के वाढ झाली आहे. त्या तुलनेत प्रवासी भाड्यात करण्यात आलेली वाढ किंचितच आहे. या भाडेवाढीनंतरही औरंगाबाद स्मार्ट सिटी बसचे प्रवास भाडे हे महाराष्ट्रातील इतर बस सेवेच्या तुलनेत सर्वात कमी आहे, असेही भुसारी यांनी सांगितले.

आता कोणत्या मार्गावर किती मोजावे लागेल प्रवास भाडे?:

 • रेल्वेस्टेशन ते शहागंज: १५ रुपये.
 • रेल्वेस्टेशन ते हर्सूल सावंगीः २५ रुपये.
 • रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉइंटः २५ रुपये.
 • रेल्वेस्टेशन ते सिडको (मार्गे एम-२): २५ रुपये.
 • औरंगपुरा ते रांजणगाव (मार्गे सेंट्रल बसस्टँड): २५ रुपये.
 • औरंगपुरा ते बजाजनगर (मार्गे सेंट्रल बसस्टँड): २५ रुपये.
 • औरंगपुरा ते हिंदुस्तान आवास (मार्गे सेंट्रल बसस्टँड): २५ रुपये.
 • औरंगपुरा ते वाळूजमार्गे सेंट्रल बसस्टँड २५ रुपये.
 • औरंगपुरा ते शिवाजीनगर (मार्गे सेंट्रल बसस्टँड): २० रुपये.
 • सिडको ते जोगेश्वरी (मार्गे बाबा पेट्रेलपंप): ३५ रुपये.
 • सिडको ते विद्यापीठ (मार्गे क्रांतीचौक): २५ रुपये.
 • सिडको ते रेल्वेस्टेशन (मार्गे बीडबायपास): २५ रुपये.
 • चिकलठाणा ते रांजणगाव (मार्गे बाबा पेट्रोलपंप): ३० रुपये.
 • औरंगपुरा ते बजाजनगर (मार्गे सेंट्रल बसस्टँड): २५ रुपये.
 • रेल्वेस्टेशन ते रेल्वेस्टेशन (मार्गे सिडको हर्सूल टी पॉइंट): ३० रुपये.
 • सिडको ते रांजणगाव (मार्गे एम-२): ३५ रुपये.
 • रेल्वेस्टेशन ते चिकलठाणा (मार्गे एसएससी बोर्ड): २५ रुपये.
 • रेल्वेस्टेशन ते भावसिंगपुरा (मार्गे क्रांतीचौक) २० रुपये.
 • रिंग रोड रेल्वेस्टेशन (मार्गे सेव्हनहिल): ३० रुपये.
 • रेल्वेस्टेशन ते औरंगाबाद लेणी (मार्गे टाऊन हॉल): २० रुपये.
 • मुकूंदवाडी रेल्वेस्टेशन ते बाबा पेट्रोलपंप (मार्गे सिडको एन-३): २० रुपये.
 • सेंट्रल बसस्टँड ते बिडकीन ३५ रुपये.
 • सेंट्रल बसस्टँड ते फुलंब्री ४० रुपये.
 • सेंट्रल बसस्टँड ते वेरूळ ४५ रुपये.
 • सेंट्रल बसस्टँड ते करमाड ३५ रुपये.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा