मोदी सरकार बॅकफूटवरः निर्णायक लढाईसाठी आलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा दिले चर्चेचे निमंत्रण!

0
125
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी आम्ही निर्णायक लढाईसाठीच दिल्लीत पोहोचलो असून आमच्या मागण्यांवर कोणताही समझौता करणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, या आंदोलनामुळे हैराण झालेल्या मोदी सरकारने आता आंदोलक शेतकऱ्यांना उद्या, मंगळवारी दुपारी तीन वाजता चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. दिल्लीत प्रवेशाचे रस्ते बंद करून टाकण्याचा इशारा दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेश या शेजारी राज्यांशी लागून असलेल्या सीमेवरील सुरक्षा वाढवली आहे.

कृषी कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या ३० शेतकरी संघटनांची सोमवारी सिंघू सीमेवर बैठक झाली. या बैठकीनंतर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवले जाईल, असे शेतकऱ्यांनी जाहीर केले आहे. आम्ही आमच्या मागण्यांच्या बाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही. आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्यात आले नाही, तर सत्ताधारी पक्षाला याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असे भारतीय किसान युनियनचे सरचिटणीस जगमोहन सिंह यांनी सांगितले.

 आम्ही दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकून बसू. येथेच आमची रणनीती आखू. आम्ही प्रधानमंत्र्यांना आमच्या ‘मन की बात’ ऐकवण्यासाठी दिल्लीला आलो आहोत. त्यांनी जर आमच्या मन की बात ऐकली नाही तर सत्ताधारी पक्षाला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

 सरकारकडून ‘पांच झूठ’ पसरवण्याचा प्रयत्नः आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत पाच खोट्या गोष्टी पसरवण्यात येत आहेत. त्यापैकी हे आंदोलन केवळ पंजाबचेच शेतकरी करत असल्याचे एक खोटे आहे. अनेक राज्यात शेतकरी करत असलेल्या ऐतिहासिक आंदोलनाचे ऐतिहासिक परिणाम हाती येतील, असे भारतीय संघर्ष समन्वय समितीचे सदस्य योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या या तिन्ही कृषी कायद्यांमुळे देशातील शेती आणि शेतकरी कॉर्पोरेटच्या ताब्यात जातील, असा दावा भारतीय किसान युनियनचे हरियाणा अध्यक्ष गुरनामसिंह चादुनी यांनी केला आहे.

मोदी सरकारकडून पुन्हा चर्चेचा सांगावाः दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आंदोलक शेतकऱ्यांना मंगळवार १ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता चर्चेचे निमंत्रण दिले आहे. मंत्र्यांची उच्चस्तरीय समिती शेतकऱ्यांशी चर्चा करणार असून दिल्लीच्या विज्ञान भवनात चर्चेसाठी येण्याचे निमंत्रण ३२ शेतकरी संघटना आणि त्यांच्या नेत्यांना देण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या या निमंत्रणावर शेतकरी संघटना मंगळवारी सकाळी बैठक घेणार आहेत.

 दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा वाढवलीः दिल्लीचा येणारे सर्व रस्ते बंद करण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी हरियाणा आणि उत्तर प्रदेश या दिल्लीला लागून असलेल्या शेजारी राज्यांच्या सीमेवरील सुरक्षा वाढवली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी विविध सीमा प्रवेश पॉइंटवर सुरक्षा वाढवली आहे. दिल्लीचे पोलिस आयुक्त एस.एन. श्रीवास्त यांनी सिंघू सीमेवर जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा