शेतकरी आंदोलनः सुप्रिया सुळेंसह १५ खासदारांना पोलिसांनी गाझीपूर सीमेवरच रोखले!

0
65
छायाचित्र सौजन्यः ट्विटर/ हरसिमरत कौर बादल

नवी दिल्लीः मोदी सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आज ७२ वा दिवस उजाडला आहे. या  आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी निघालेल्या विरोधी पक्षाच्या १५ खासदारांना पोलिसांनी गाझीपूर सीमेवरच रोखले. शेतकऱ्यांची भेट घेण्यापासून त्यांना अडवण्यात आले.

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी विविध पक्षाच्या १५ खासदारांचे शिष्टमंडळ गाझीपूर सीमेवर निघाले होते. या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, द्रमुकच्या कनिमोळी, अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळाला  पोलिसांकडून बॅरिकेडिंग ओलांडून आत जाण्यास परवानगी नाकारण्यात आली.

आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी निघालेल्या खासदारांनाही अडवण्यात येतेय. शेतकऱ्यांना भेटू दिले जात नाही. लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे, असे ट्विट खा. हरसिमरत कौर यांनी केले आहे. शांततामय मार्गाने आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांवर होत असलेले अत्याचार तत्काळ थांबवण्याची मागणीही त्यांनी केली.

तुरूंगातही लोकांना जेवण, पाणी आणि वीज दिली जाते. येथे तर शेतकऱ्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलले जात आहे, असे वाटू लागले आहे, असे हरसिमरत कौर म्हणाल्या.

संतापजनक परिस्थिती आहे. आपण भारतातच आहोत का यावर माझा विश्वासच बसत नाही. आपण अन्नदाता सुखी भव म्हणतो, परंतु ज्या रितीने बॅरिकेडिंग करण्यात आले आहे, एवढे बॅरिकेडिंग कुठल्या सीमेवरही नाही, असे सांगत जागा, अजूनही वेळ झालेला नाही. केंद्र सरकारने अहंकार बाजूला ठेवून याच्यातून मार्ग काढला पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा