शेतकरी आंदोलनः महाराष्ट्रातील ८२ टक्के शेतकऱ्यांचा कृषी कायद्यांना विरोध

0
43
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला शंभरपेक्षा जास्त दिवस उलटून गेलेले आहेत. फक्त पंजाब आणि हरियाणातील शेतकरीच या कृषी कायद्यांना विरोध करत आहेत, असे चित्र मोदी सरकारकडून उभे केले जात असतानाच महाराष्ट्रातून या संदर्भात महत्वाची माहिती पुढे आली आहे. महाराष्ट्रातील ८२.२ टक्के शेतकऱ्यांचा मोदी सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून पुढे आली आहे.

गेल्या वर्षी मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. हे तिन्ही कृषी कायदे मागे घ्या आणि शेतमालाला हमीभाव देणारा कायदा करा, अशी आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर किसान आझादी आंदोलनाच्या वतीने १६ जानेवारीपासून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यातील १ हजार ६१४ शेतकऱ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला. त्यापैकी ८२.२ टक्के शेतकरी या तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात असल्याचा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना या कृषी कायद्यांबाबत माहिती आहे, हेही जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणातून करण्यात आला. ८९.३ टक्के शेतकरी या कृषी कायद्यांबाबत जागृत असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

तिन्ही कृषी कायदे शेतकरी हिताचेच आहेत, असा जोरदार प्रचार मोदी सरकारने शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केला आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे कृषी कायदे शेतकरी हिताचे आहेत काय? असे विचारण्यात आले असता ८२.२ टक्के शेतकऱ्यांनी हे कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत, असे उत्तर दिले आहे.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींनुसार शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी द्यावा, अशी जुनीच मागणी आहे. महाराष्ट्रातील ९४ टक्के शेतकऱ्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात अशी मागणी  या सर्वेक्षणात केली आहे. हा खरा प्रश्न आहे. सरकार दरवर्षी हमी जाहीर करते. परंतु शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभावाप्रमाणे भाव मिळतो का? या सर्वेक्षणातही शेतकऱ्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. ८२.६ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याचे सांगितले तर ७.५ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतमलाला सरकारने जाहीर केलेल्या हमीभावाप्रमाणे भाव मिळतो, असे सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा