शेतकऱ्यांचा एल्गारः उद्या देशभर प्रतिमा दहन, ८ डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक

0
88
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरुद्ध आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे तिन्ही कायदे रद्द करण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत मोदी सरकारने केलेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्यानंतर आता आंदोलक शेतकऱ्यांनी उद्या, शनिवारी देशभर प्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमांचे दहन करण्याची घोषणा केली आहे. तसेच ८ डिसेंबर रोजी एक दिवसाच्या देशव्यापी बंदची हाकही दिली आहे.

 मोदी सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे शेती आणि शेतकऱ्यांना कॉर्पोरेटच्या दावणीला बांधणारे आहेत, त्यामुळे ते रद्द करावेत, त्यात सुधारणा नको, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. त्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकरी या कायद्यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी दिल्लीच्या दिशेने निघाले होते, मात्र त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवण्यात आले असले तरी ते आंदोलनावर ठाम आहेत.

शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नमते घेत मोदी सरकारने आंदोलकांना चर्चेसाठी निमंत्रित केले. मात्र या चर्चेच्या फेऱ्यांतून कोणताही तोडगा निघालेला नाही. हे कायदेच रद्द करा, या मागणीवर आंदोलक शेतकरी ठाम आहेत. त्यामुळे आता उद्या देशभर प्रधानमंत्री मोदींच्या प्रतिमा दहन करण्याची घोषणा त्यांनी केली असून ८ डिसेंबर रोजी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. दरम्यान, उद्या मोदी सरकारने बैठक बोलावली असून या बैठकीलाही शेतकरी हजर राहतील, असे आंदोलक शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

 आपल्या मागण्यांवर कोणतीही तडजोड करायची नाही, या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. मोदी सरकारने लागू केलेले कृषी कायदे रद्द होईपर्यंत आंदोलन सुरुच राहील, असे या शेतकऱ्यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे. हे कायदे रद्द करावेत, हीच आमची ठाम भूमिका आहे, असे अखिल भारतीय किसान सभेचे कार्यकारी सचिव हनान मोलाह यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा