शेतकरी आंदोलनः ८ डिसेंबरला सकाळपासून रात्री ८ वाजेपर्यंत भारत बंद, दुपारी ३ वाजेपर्यंत चक्का जाम

0
228
संग्रहित छायाचित्र.

नवी दिल्लीः मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी येत्या ८ डिसेंबर रोजी भारतबंदची हाक दिली आहे. किसान संयुक्त मोर्चाने रविवारी पत्रकार परिषद घेऊन या भारतबंदची माहिती दिली. ८ डिसेंबरला संपूर्ण भारत बंद असेल. दुपारी तीन वाजेपर्यंत चक्का जाम आंदोलन असेल. बंदमधून ऍम्बुलन्स आणि आपत्कालीन सेवा वगळण्यात आल्या आहेत. तसेच विवाह समारंभांनाही बंदमधून सूट देण्यात आली असल्याची माहिती संयुक्त मोर्चाचे संयोजक योगेंद्र यादव यांनी दिली.

तिन्ही कृषी कायदे पूर्णतः रद्द करण्यात यावेत, अशी आमची मागणी आहे. आम्ही पहिल्या दिवसापासूनच हे कायदे मागे घेण्याचा आग्रह धरत आहोत. ही मागणी सोडून आम्ही कोणतीही वेगळी भूमिका घेतलेली नाही. हमीभावाची हमी देणारा कायदा बनवण्यात यावा अशी आमची मागणी असल्याचेही योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः भाजपशासित राज्यात शेतकऱ्यांना केंद्र सरकारने डांबून ठेवलेः राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप

भारत बंदला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांचे यादव यांनी आभार मानले आहेत. राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षांचे झेंडे जोडून शेतकऱ्यांचा झेंडा हाती घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. विद्यार्थी, महिला संघटना, लेखक संघटनांनीही या बंदला पाठिंबा दिला आहे. उत्तराखंड देव व्यापार मंडळ, देवभूमी व्यापार मंडळानेही या बंदला पाठिंबा जाहीर केल्याचे यादव म्हणाले.

 राष्ट्रीय उद्योग व्यापार मंडळानेही ८ डिसेंबरच्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही या बंदला पाठिंबा दिला आहे. पंजाब आणि हरियाणातील सर्व बाजार समित्या बंदच्या समर्थनार्थ बंद राहतील. हे आंदोलन आता केवळ शेतकऱ्यांचे आंदोलन राहिले नसून देशाचे आंदोलन बनले आहे, असे यादव म्हणाले.

 ८ डिसेंबरला संपूर्ण भारत बंद राहील. दुपारी ३ वाजेपर्यंत चक्का जाम राहील. आम्ही हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करणार आहोत. ऍम्बुलन्स, आपत्कालीन सेवांना या बंदमधून वगळण्यात आले आहे. सध्या उत्तर भारत परिसरात लग्न समारंभ चालू आहेत. त्यामुळे या बंदमधून लग्न समारंभांनाही सूट देण्यात आल्याचे योगेंद्र यादव म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा