दिल्लीच्या सीमांवरील शेतकरी आंदोलन अखेर स्थगीत, ३७८ दिवसांपासून सुरू होता सत्याग्रह!

0
171
छायाचित्र सौजन्यः ट्विटर

नवी दिल्लीः केंद्र सरकारने केलेले तीन वादग्रस्त कृषी कायदे आणि अन्य मागण्यांसाठी तब्बाल ३७८ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन आज अखेर संपले. ११ डिसेंबरपासून आंदोलक शेतकरी  दिल्लीच्या सर्व सीमांवरून आपल्या घरी परतण्यास सुरूवात करणार आहेत. केंद्र सरकारने सर्व मागण्या मान्य केल्यामुळे संयुक्त किसान मोर्चाने आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.

सिंघू सीमेवर संयुक्त किसान मोर्चाची गुरूवारी बैठक झाली. त्या बैठकीत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. या घोषणेनंतर शेतकऱ्यांनी सिंघू सीमेवरून आपले तंबू हटवण्यास सुरूवात केली आहे. ११ डिसेंबरपासून शेतकरी सीमेवरून आपल्या घरी परतण्यास सुरूवात करणार आहेत. एमएसपीबाबत समिती स्थापन करण्याचे आणि शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे लेखी आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणा सरकारने शेतकरी आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना भरपाई देण्याच्या मुद्याला तत्वतः संमतीही दिली आहे. केंद्र सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर संयुक्त किसान मोर्चाने सिंघू सीमेवर बैठक घेतली आणि आंदोलन संपवण्यावर बैठकती एकमत झाले.

चला उद्योजक बनाः एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

शेतकरी मोठा विजय घेऊन घरी जात आहेत. १५ जानेवारी रोजी शेतकरी आढावा बैठक घेतील, असे शेतकरी नेते बलबीरसिंग राजेवाल यांनी सांगितले. शेतकरी आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच त्यांनी आभार मानले आहेत.

…तर पुन्हा आंदोलनः केंद्र सरकारने दिलेली आश्वासने जर पाळली नाही आणि थोडेही इकडे-तिकडे केले तर शेतकरी पुन्हा आंदोलन सुरू करतील. केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनांचा शेतकरी दरमहिन्याला आढावा घेतील. कृषी विभागाचे सचिव संजय अग्रवाल यांचे पत्र मिळाले आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करूनच वीज विधेयक संसदेत मांडले जाईल, असे आश्वासन केंद्र सरकारने दिले आहे, असे शेतकरी नेते गुरनामसिंग चढूनी यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १९ नोव्हेंबर रोजी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली होती. मोदींच्या या घोषणेनंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच होते. कायदे मागे घेतल्याच्या घोषणेनंतरही जवळपास २० दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते.

विजय साजरा करणार नाहीः शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यामुळे हा शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय आहे. मात्र संयुक्त किसान मोर्चाने हा विजय साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाल्यामुळे संपूर्ण देश दुःखी आहे. त्यामुळे शेतकरी विजय साजरा करणार नाहीत, असे संयुक्त किसान मोर्चाने म्हटले आहे. स्वातंत्र्यानंतरचे भारतातील हे सर्वात शांत आणि सर्वात मोठे शेतकरी आंदोलन असल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा