शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमध्ये भाजपचा सफाया, स्थानिक संस्था निवडणुकीत दणकून पराभव

0
265
प्रातिनिधिक छायाचित्र.

चंदीगडः मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमांवर ८४ दिवसांपासून अधिक काळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद पंजाबमधील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या निकालातही उमटले. काँग्रेसने पंजाबमधील आठपैकी सात महानगरपालिका आणि १०९ पैकी ६३ नगर परिषदांवर दणदणीत विजय मिळवत भाजपचा सफाया केला आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबी मतदारांनी भाजपला दिलेला हा जोरदार झटका असून भाजपसाठी धोक्याची घंटा मानण्यात येत आहे.

 भटिंडा, बाटला, पठाणकोट, अबोहर, मोगा, होशियारपूर, कपूरथला या महानगरपालिका काँग्रेसने मोठ्या बहुमताने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे तब्बल ५३ वर्षांनी भटिंडा महानगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात आली आहे. भटिंडात काँग्रेसने ५० पैकी ४३ जागा जिंकल्या आहेत. भाजपला येथे एकही जागा मिळाली नाही. एवढी वर्षे या महानगरपालिकेत शिरोमणी अकाली दलाची एकहाती सत्ता होती.

 बाटलामध्ये काँग्रेसने ५० पैकी ३६, कपूरथलामध्ये ५० पैकी ४४, पठाणकोटमध्ये ५० पैकी ३७, होशियारपूरमध्ये ५० पैकी ४१ जागा जिंकल्या आहेत. मोगामध्ये काँग्रेसने २०, अकाली दलाने १५ तर भाजपने १ जागा जिंकली आहे.

दिल्लीच्या गाझीपूर, सिंघू, टिकरी सीमेवर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि इतर राज्यांतील शेतकरी तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनावरून काँग्रेसने मोदी सरकार आणि भाजपला कायम लक्ष्य केले आहे. काँग्रेस शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचे सांगत काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबाही जाहीर केला आहे. शेतकरी आंदोलनामुळे पंजाबमध्ये भाजपविरोधी वातावरण तयार झाल्याचेच या निवडणूक निकालांवरून दिसू लागले आहे. नजीकच्या काळात अन्य राज्यांतील निवडणुकांतही असा ट्रेंड पहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा