शेतकऱ्यांना पाठिंब्यासाठी राजभवनाला घेराव घालण्याचा काँग्रेसचा इशारा

0
71
संग्रहित छायाचित्र.

मुंबई मोदी सरकारने लादलेल्या तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर ४१ दिवसांपासून लाखो शेतकरी  थंडीत ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनात आतापर्यंत ६० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे निर्दयी, अहंकारी मोदी सरकारला जागे करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी १६ जानेवारीला ‘राजभवनला घेराव’ घालण्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे.

मोदी सरकार शेतकरी, कामगार, सामान्य जनतेच्या मुद्द्यांवर कमालीचे असंवेदशील आहे. तिन्ही जुलमी कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून ते भांडवलदारांच्या हिताचे असल्याची शेतकऱ्यांची भूमिका योग्य असून काँग्रेस पक्षाने वारंवार शेतकऱ्यांना पाठिंबा देत विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.  एकीकडे शेतकरी, कामगार उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडे इंधन दरवाढ करून सामान्य जनतेची लूट सुरू आहे. कृषी कायदे रद्द करावेत आणि पेट्रोल- डिझेलची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी या मागणीसाठी १६ तारखेला आंदोलन केले जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.  

शेतकऱ्यांबरोबर मोदी सरकारने सामान्य जनतेला लुटण्याचा उद्योग सुरु केला आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात सतत दरवाढ करुन नफेखोरी केली जात आहे. इंधन दरवाढीने ७३ वर्षातील उच्चांक गाठला आहे. मे २०१४ मध्ये पेट्रोलवर असलेली ९.२० रुपये एक्साईज ड्युटी वाढवून मागील सहा वर्षात मोदी सरकारने ३२.९८ रुपये केली. लिटरमागे २३.७८ रुपयांची वाढ ही २५८ टक्के आहे.

डिझेलची मे २०१४ मध्ये असलेली ३.४६ रुपये एक्साईज ड्युटी आज ३१.८३ रुपये केली म्हणजे प्रति लिटर २८.३७ रुपये आणि ८२० टक्क्यांची वाढ. विशेष म्हणजे जगात क्रूड ऑइलचे दर ११० डॉलर प्रति बॅरलवरून ५० डॉलर प्रति बॅरल एवढे घसरलेले असताना ही इंधन दरवाढ केली जात आहे. इंधन दरवाढीतून मोदी सरकारने आतापर्यंत १९ लाख कोटी रुपयांची नफेखोरी केली आहे, अशी टीकाही थोरात यांनी केली.

१६ जानेवारीला  किसान अधिकार दिवस: काँग्रेस पक्ष शेतकरी आणि सामान्य जनतेच्या प्रश्नी  नेहमीच उभा राहिला असून १६ जानेवारीला ‘किसान अधिकार दिवस’ पाळून आंदोलन केले जाणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा