कृषी कायद्यांना स्थगितीचा केंद्राचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावला, आज पुन्हा चर्चेची फेरी

0
74
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः तिन्ही कृषी कायद्यांना दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावून लावला आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द करा आणि शेतमालाच्या हमीभावाला कायदेशीर संरक्षण द्या, या दोन मागण्यांशिवाय अन्य कोणताही पर्याय स्वीकारार्ह नसल्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाच्या गुरूवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, आज शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्या चर्चेची आकरावी फेरी होणार आहे.

शेतकरी आणि केंद्र सरकारदरम्यान बुधवारी नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायद्यांना दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव शेतकरी नेत्यांसमोर ठेवला होता. हा प्रस्ताव देतानाच तिन्ही कृषी कायद्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी समिती नेमण्याची अटही केंद्राने घातली होती. या प्रस्तावावर सर्वसंमतीने विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे या बैठकीत शेतकरी नेत्यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना सांगितले होते.

या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर सिंघू सीमेवर गुरूवारी संयुक्त किसान मोर्चाची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारचा हा प्रस्ताव एकमताने धुडकावून लावण्यात आला. दरम्यान, शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये चर्चेची आकरावी फेरी आज होणार असून यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने केंद्र सरकारला शेतकऱ्यांचा हा निर्णय कळवला जाणार आहे. आज दुपारी दोन वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत केंद्र सरकार शेतकऱ्यांना कोणता प्रस्ताव देते, त्यावर दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे भवितव्य ठरणार आहे.

प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर परेड काढणारचः दरम्यान, प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या आऊटर रिंग रोडवर ट्रॅक्टर परेड काढण्याच्या निर्णयावरही शेतकरी ठाम आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात कोणताही अडसर आणणार नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आऊटर रिंग रोडवर ट्रॅक्टर परेड काढणार आहोत, असेही शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले आहे. या ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होणाऱ्या ट्रॅक्टरवर भारताचा तिरंगा आणि शेतकरी संघटनेचे झेंडे असतील. कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे लावण्यास परवानगी असणार नाही. या ट्रॅक्टर परेडमध्ये शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांचे कुटुंबीय, भारतीय लष्करातून निवृत्त झालेले अधिकारी आणि नामवंत खेळाडू सहभागी होतील, असे संयुक्त किसान मोर्चाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा