शेतकरी घालणार आज राजभवनाला घेराव, आझाद मैदानावरील सभेनंतर निघणार मोर्चा

0
66

मुंबईः मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मुंबईच्या आझाद मैदानावर राज्याच्या २१ जिल्ह्यातून हजारो शेतकरी एकवटले आहेत. आता थोड्याच वेळात म्हणजे सकाळी ११ वाजता आझाद मैदानावर सभा झाल्यानंतर शेतकरी राजभवनाला घेराव घालणार आहेत.

मोदी सरकारचे शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या, या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर कालपासून हजारो शेतकरी एकत्र आले आहेत. आज आझाद मैदानावर शेतकऱ्यांची सभा होणार आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत डावे, लोकशाही पक्षांचे प्रमुख नेते आणि दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाचे एक प्रमुख नेते हनन मोल्ला हेही या सभेला संबोधित करणार आहेत.

ही सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांच्या मोर्चा निघणार आहे. हा मोर्चा राजभवनाला घेराव घालणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी राज्यपालांना निवेदन देतील. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देशभरातील राजभवनांना २३ ते २६ जानेवारी या काळात घेराव घालण्याची हाक देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे सहभागी होणार का?: दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सहभागी होणार असल्याची चर्चा कालपासूनच होती. शिवसेनेचा या आंदोलनाला पाठिंबा असला तरी मुख्यमंत्रिपद हे घटनात्मक पद असून या पदावरील व्यक्तीने अशा प्रकारच्या आंदोलनात सहभागी होणे उचित ठरणार नाही, असा विचार पुढे आल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता कमीच आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा