भाजपच्या लबाडीचा भंडाफोडः पोस्टरबाजीत फोटो वापरलेला शेतकरीच देतोय दिल्लीत धरणे!

0
374
छाचाचित्रः हरप्रीत सिंग यांच्या ट्विटर हँडलवरून साभार.

नवी दिल्लीः मोदी सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर गेल्या २८ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत शेतकरी आंदोलन करत असतानाच या कायद्यांचे फायदे सांगण्यासाठी भाजपने केलेली पोस्टरबाजी त्यांच्यावरच उलटली आहे. पोस्टरबाजीत भाजपने ज्या शेतकऱ्याचे छायाचित्र वापरले आहे, तोच शेतकरी दिल्लीच्या सीमेवर धरणे देत आहे. त्यामुळे भाजपची लबाडी उघडकीस आली आहे.

मोदी सरकारच्या तिन्ही नव्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून प्रचंड विरोध होत आहे. हे कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही दिल्लीच्या सीमेवरून हटणार नाही, या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. तर दुसरीकडे हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांच्या कसे फायद्याचे आहेत, हे सांगण्यासाठी मोदी सरकारने आणि भाजपने आपली पूर्ण शक्ती लावली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंजाब भाजपने हरप्रीत सिंग या शेतकऱ्याचा फोटो वापरून या कायद्यांचे फायदे सांगणारे पोस्टर्स तयार केले आहेत आणि या तिन्ही कायद्यांमुळे हरप्रीत सिंग या शेतकरी सुखी असल्याचे दाखवण्यात आले आहे.

भाजपने ज्या शेतकऱ्याला तिन्ही कृषी कायद्यांमुळे सुखी असलेला शेतकरी दाखवले आहे, तोच हरप्रीत सिंग हा शेतकरी दिल्लीच्या सिंघू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी आहे आणि तेथे तो धरणे देत आहे. जेव्हा हे पोस्टर हरप्रीत सिंगच्या लक्षात आले तेव्हा त्यानेच बेशरमपणाचीही हद्द झाली, असे म्हणत भाजपच्या या पोस्टरबाजीचा भंडाफोड केला आहे.

भाजपने हरप्रीत सिंग यांचे पोस्टरवर वापरलेले छायाचित्र सहा ते सात वर्षे जुने आहे. हेच छायाचित्र भाजपने पोस्टरबाजीसाठी वापरले आहे. हरप्रीत सिंग यांची परवानगी न घेताच भाजपने पोस्टरवर हे छायाचित्र वापरले आहे. मी सिंघू सीमेवर आंदोलन करत असताना भाजपने हे छायाचित्र वापरून बेशरमपणाची हद्द केली. जिओच्या अनलिमिटेड इंटरनेट पॅकप्रमाणेच भाजपचा हा बेशरमपणाही अनलिमिटेड आहे, असे हरप्रीत सिंग यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा