आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना सचिनने काळजी घ्यावीः शरद पवारांचा सल्ला

0
954
संग्रहित छायाचित्र.

पुणेः शेतकरी आंदोलनाबाबत मोदी सरकारधार्जिणे ट्विट करून टिकेचा धनी ठरलेल्या माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वडिलकीचा सल्ला आहे. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी, असा माझा सचिनला सल्ला राहील, असे शरद पवार म्हणाले.

पॉप गायिका रिहाना, नोबेल पुरस्कार विजेती ग्रेटा थनबर्ग आणि मिया खलिफा या आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले. त्यानंतर देशातील सेलिब्रेटींनी एक सुरात त्या विरोधात भूमिका घेतली. या सेलिब्रेटींमध्ये ट्विट करणाऱ्यात सचिन तेंडुलकरपासून ते लता मंगेशकरपर्यंत सर्वच जण होते. सचिन तेंडुलकरने सरकारला अनुकूल ठरणारी भूमिका घेतल्यामुळे त्याच्यावर सार्वत्रिक टिकेची झोड उठली.

शरद पवार यांना याबाबत विचारले असता लता मंगेशकर, सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर सामान्य लोक तीव्रपणे व्यक्त होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी, असा माझा सचिनला सल्ला राहील, असे पवार म्हणाले.

इतके दिवस कष्टकरी वर्ग रस्त्यावर बसला आहे, त्याचा विचार करायला पाहिजे, त्याचाच प्रतिसाद म्हणून आंतरराष्ट्रीयस्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपवाले शेतकऱ्यांना कधी अतिरेकी म्हणतात. शेतकरी आंदोलनाला बदनाम करत आहेत, असेही पवार म्हणाले.

शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. वरिष्ठ मंत्र्यांनी, प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, गडकरीसारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला तर मार्ग निघण्याची शक्यता आहे. यात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तौमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही. स्वातंत्र्यानंतर कधी असे घडले नाही. सरकारनेही टोकाची भूमिका घेतल्यामुळे त्यांचे धोरण स्पष्ट होत आहे. अन्नदाता जर रस्त्यावर बसतो तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, असे पवार म्हणाले.

 काय म्हणाला होता सचिन?: ‘भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती फक्त बाहेरून पाहू शकतात, पण हस्तक्षेप करू शकत नाहीत. भारतीयांना भारत माहीत आहे आणि तेच भारताबद्दल ठरवतील. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहू या’ असे ट्विट सचिनने केले होते. त्यासोबत #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda  हे परराष्ट्र मंत्रालयाने दिलेले दोन हॅशटॅगही वापरले होते.

सेलिब्रेटींचे शब्दशः सारखेच ट्विटः पॉपस्टार रिहाना, ग्रेटा थनबर्ग इत्यादी आंतरराष्ट्रीय सेलिब्रेटींनी ट्विट करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर भारतातील सेलिब्रेटींनीही त्यांच्या विरोधात भूमिका घेत ट्विट केले. मात्र या ट्विटपैकी अनेक सेलिब्रेटींचे ट्विट शब्दशः सारखेच आहेत. एका शब्दांचाही फरक अथवा बदल या ट्विटमध्ये नाही. चित्रपट अभिनेता अक्षय कुमार आणि बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांचे ट्विट सारखेच आहेत. म्हणजेच ही मोहीम ठरवून राबवण्यात आली होती, हेच यावरून स्पष्ट होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा