शेतकरी आंदोलनः सरकारकडून विरोधकांची घेराबंदी, सपा नेते अखिलेश यादव नजरकैदेत!

0
78

नवी दिल्लीः तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना विविध राजकीय पक्षांकडून वाढता पाठिंबा मिळू लागला आहे. त्यामुळे सरकारने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरू पाहणाऱ्या विरोधकांची घेराबंदी करण्यास सुरुवात केली असून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांना त्यांच्या घरातच नजरकैद करण्यात आले आहे. त्यांच्या निवासस्थानाकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आले आहेत.

मोदी सरकारने लागू केलेले तीन नवीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या १२ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ अखिलेश यादव यांनी किसान यात्रा काढण्याची घोषणा केली होती. त्यांना या किसान यात्रेत सहभागी होता येऊ नये म्हणून त्यांना घरातच नजरकैद करण्यात आल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे.

लखनऊच्या विक्रमादित्य मार्गावर अखिलेश यादव यांचे निवासस्थान आहे. त्यांच्या निवासस्थाकडून बाहेर जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बॅरिकेडिंग करून बंद केले आहेत. विशेष म्हणजे दुहेरी बॅरिकेडिंग करून हे रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यांच्या निवासस्थानापासून ते पक्षाच्या प्रदेश कार्यालयापर्यंत अशी घेराबंदी करण्यात आली आहे की, त्यांना तेथे पोहोचणे अशक्य आहे. या परिसरात पोलिसांची गस्तही सुरु आहे.

कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ अखिलेश यादव यांनी किसान यात्रा काढण्याची घोषणा केली होती. आज सकाळी त्यांनी ट्विटही केले होते. ‘कदम कदम बढाए जा, दंभ का सर झुकाए जा। ये जंग है जमीन की, अपनी जान भी लगाए जा,’ असे अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते या किसान यात्रेत सहभागी होऊ नये म्हणून त्यांना बळजबरी पोलिस ठाण्यात नेऊन बसवण्यात येत असल्याचा आरोप समाजवादी पार्टीने केला आहे. भाजप सरकारकडून शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय आणि शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात सपाच्या किसान यात्रेला घाबरलेल्या सत्तेने ही यात्रा रोखण्यासाठी समाजवाद्यांचे दमन सुरु केले आहे. बेकायदेशीरपणे त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून, घरीच रोखले जात आहे, असे समाजवादी पार्टीने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा