डॉ. अशोक ढवळे लिहितात… भाजप सरकार आणि पोलिसांच्या संगनमताने घडवलेला हिंसाचार!

0
567
छायाचित्र सौजन्यः ट्विटर

लाल किल्ल्याभोवती आणि तेही प्रजासत्ताक दिनादिवशी पोलीस आणि सैन्याचा इतका कडेकोट पहारा असताना कुणा सोम्यागोम्याला लाल किल्ल्यावर इतक्या सहजपणे झेंडा फडकावता येईल? ’वरून आलेल्या आदेशा’विना ते शक्यच नाही! पोलिसांनी निशाण साहिबचा झेंडा लगेच उतरवला तर नाहीच, पण तो पुढे दोन तास तसाच ठेवला. त्याचे लाचार गोदी मीडियाला यथेच्छ चित्रण करायची संधी मिळावीयासाठी. पंजाब आणि उर्वरित भारत यांच्यात धार्मिक पाचर ठोकून शेतकरी एकजूट मोडण्याचा त्यांचा उद्देश स्पष्ट होतो.

डॉ. अशोक ढवळे (लेखक अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.)

भारताच्या इतिहासात इतके विलोभनीय दृश्य क्वचितच दिसले असेल. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत एक लाखाहून अधिक ट्रॅक्टरवरून लाखो शेतकऱ्यांनी मिरवणूक काढली. त्यातल्या प्रत्येक ट्रॅक्टरवर तिरंगा अभिमानाने डौलत होता  आणि त्याच्या जोडीला होता त्या त्या शेतकरी संघटनेचा झेंडा. दिल्लीच्या सीमांवर गेले दोन महिने सुरू असलेल्या अपरिमित शांततापूर्ण आंदोलनाचा तो अत्युच्च बिंदू होता. देशातील ५०० शेतकरी संघटना सामील झालेल्या या अभूतपूर्व आंदोलनाचे नेतृत्व संयुक्त किसान मोर्चा करत आहे.

या प्रसंगी सर्वात सुखवणारे दृश्य होते त्या ट्रॅक्टर परेडवर दिल्ली आणि आसापासच्या सर्वसामान्य जनतेने केलेला प्रेमाचा वर्षाव. शेतकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी, त्यांच्यावर गुलाबाची फुले उधळण्यासाठी, त्यांना मिठाई आणि इतर खाद्यपदार्थ खिलवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोटले होते हजारो लोक. सामान्य दिल्लीकर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला होता.

दिल्लीच्या सर्व सीमांवर आयोजित करण्यात आलेल्या किसान ट्रॅक्टर परेडमध्ये अखिल भारतीय किसान सभा, सीटू, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, एसएफआय आणि डीवायएफआयचे केंद्रीय व राज्य नेतृत्व आणि हजारो कार्यकर्ते आणि अनुयायी सहभागी झाले होते. त्या परेडमध्ये इतर शेतकरी संघटनांच्या सोबतीने अखिल भारतीय किसान सभेचे झेंडेही उंच उंच फडकत होते. साधारणतः असेच चित्र, अर्थात कमी प्रमाणावर देशातील विविध राज्यांच्या राजधान्या आणि शेकडो जिल्हा केंद्रांमध्ये दिसून आले. लाखो लोक आपल्या ट्रॅक्टर आणि इतर वाहनांतून रस्त्यारस्त्यातून मिरवणुकात सहभागी झाले होते.

हे सर्व शेतकरी गेले काही महिने लढत आहेत, आपल्या जिव्हाळ्याच्या मागण्यांसाठी! लोकशाहीचा मुडदा पाडत संसदेत जबरदस्तीने लादलेले जनताविरोधी आणि कॉर्पोरेट धार्जिणे कृषी कायदे रद्द करा, क्रॉस सबसिडी मोडीत काढत वीजबिलात महाभयानक वाढ करणारे आणि वीज क्षेत्राचे खासगीकरण करणारे वीज विधेयक मागे घ्या आणि शेतमाल खरेदी करण्याची खात्री देणारा आणि त्याला रास्त हमीभाव देणारा कायदा करा या मागण्या ते करत आहेत.

सरकारी हस्तक आणि पोलिसांनी चिथावलेला हिंसाचारः दिल्लीच्या सभोवतीच्या रिंग रोडवरून ही परेड करण्याचा संयुक्त किसान मोर्चाचा मानस होता. पण पोलिसांनी त्या मागणीला नकार देत मध्य दिल्ली टाळणारा मार्ग मंजूर केला. परिस्थिती जास्त गुंतागुंतीची होऊ नये  यासाठी शेतकऱ्यांनी पोलिसांची ही सूचना स्वीकारली. पण त्याचबरोबर ही परेड शांततेत पार पडली पाहिजे, याविषयी शेतकरी नेते अतिशय आग्रही होते. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा सरकार आयोजित कार्यक्रम पार पडल्यानंतर सकाळी १० वाजता शेतकरी परेड आयोजित करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला.

२७ जानेवारीला संध्याकाळी सिंघू सीमेवर झालेल्या संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत अतिशय गांभीर्याने आणि साकल्याने आधल्या दिवशीच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला. त्या बैठकीस किसान सभेच्या वतीने हन्नन मोल्ला आणि मीही उपस्थित होतो. दिल्लीच्या सीमांवर जमलेल्या शेतकऱ्यांपैकी ९९.९ % शेतकरी अतिशय शांततेने आणि उत्साहाने ठरलेल्या मार्गावरील परेडमध्ये सहभागी झाले असल्याचे या बैठकीत घेण्यात आलेल्या आढाव्यात स्पष्ट झाले.

केवळ ०.१ टक्का आंदोलकांनी शिस्त धाब्यावर बसवून सकाळी ७ आणि ८ च्या दरम्यान परेडला सुरवात केली. हे लोक येथील आंदोलनाचा प्रमुख भाग कधीच नव्हते. त्यांना पोलिसांनी बिलकुल अटकाव केला नाही. आणि दिल्लीच्या विविध भागात घुसले ते हेच लोक. त्यापैकी काही गट लाल किल्ला आणि आयटीओ या भागात गेले. त्यापैकी एका गटाने लाल किल्ल्यावरील एका रिकाम्या खांबावर शिखांचा निशान साहिब हा झेंडा फडकवला. मात्र, असे करताना त्यांनी लाल किल्ल्यावर फडकत असलेल्या राष्ट्रध्वजाला धक्काही लावला नाही. तरीही हे कृत्य चुकीचेच होते.

पोलिसांनी आधी शेतकऱ्यांना दिल्लीत शिरण्याची संधी देऊन मग त्यांच्यावर तुफानी लाठीहल्ला चढवला. अश्रुधुराच्या बेसुमार नळकांड्या फोडल्या. तेथे झालेल्या गोंधळात ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात नवनीत सिंग नावाचा तरुण शेतकरी ठार झाला. पोलिसांच्या लाठीमारात शेकडो शेतकरी जबर जखमी झाले आणि त्यापैकी अजून कित्येक इस्पितळात आहेत.

दुर्दैवी वळण घेतलेल्या या घटनेचा संयुक्त किसान मोर्चाने दुपारी एका पत्रकाद्वारे तातडीने निषेध केला. तसेच त्यानंतर काही वेळाने एक पत्रक काढून सर्वांनी ट्रॅक्टर परेड बंद करून तातडीने आपल्या राहुट्यांत परतण्याचे आवाहन केले.

प्रजासत्ताक दिनी निघालेल्या ट्रॅक्टर परेडवर दिल्लीकरांनी फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.मात्र ते गोदी मीडियाला दिसले नाही.(छायाचित्र सौजन्यः ट्विटर)

हिंसाचारास कोण जबाबदार?:  या हिंसाचारास कोण जबाबदार आहे, यावरही संयुक्त किसान मोर्चाच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. चर्चेच्या अंती तीन घटक जबाबदार असल्याचे उघड झाले. ते म्हणजे दीप सिद्धू, सतनाम सिंग पन्नू यांच्या नेतृत्वाखालील किसान मजदूर संघर्ष समिती आणि भाजपचे केंद्र सरकार आणि त्याच्या अखत्यारीतील दिल्ली पोलीस. या तीन घटकांनी संगनमताने हा कारस्थानी बनाव घडवून आणला.

दीप सिद्धू कोण?: २०१९च्या लोकसभा निवडणुकीत गुरूदासपूर मतदारसंघातील भाजपचा उमेदवार असलेल्या सनी देवलचा हा निवडणूक प्रमुख. या सिद्धूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतचे फोटो देशभर व्हायरल झाले आहेत. २५ जानेवारीच्या रात्री सिंघू सीमेवरील मुख्य सभेच्या स्टेजवरून दिल्लीवर हल्ला करण्याच्या भडक घोषणा देत तो तरुणांना चिथावत होता. लाल किल्ल्यावर निशाण साहिबचा झेंडा लावण्यासाठी काही तरुणांना तो उचकावत असल्याची व्हिडीओ फीत आता प्रकाशात आली आहे. या त्याच्या कृत्याला जोरदार विरोध करणारे शेतकरीही त्या फितीत दिसत आहेत. त्यानंतर तो मोटरसायकलवरून पळून जातानाही दिसतो.

दीप सिद्धूचा ‘ईश्वर’म्हणजे मोदी सरकारः २८ जानेवारीच्या ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. त्यानुसार २० जानेवारीला पंजाबहून दिल्लीला येणाऱ्या शेकडो ट्रॅक्टर्सचे फेसबुकवरून लाईव्ह प्रक्षेपण करत दीप सिद्धू म्हणाला, “पिक्चर तो अभी बाकी है, मेरे दोस्त.” २३ जानेवारीला त्याने आपली एका पंजाबी वेब चॅनलला दिलेली मुलाखतही शेअर केली. मुलाखतीत तो म्हणाला, “२६ जानेवारीला काय होईल त्याचे आपल्याला नियोजन करता येणार नाही. ते आपल्या कल्पनेपलीकडील असेल. ते अनपेक्षित असेल. २६ जानेवारीला काय करायचे ते ईश्वरच ठरवील.” सिद्धूचा ’ईश्वर’ म्हणजे मोदी सरकार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे!

लाल किल्ल्याभोवती आणि तेही प्रजासत्ताक दिनादिवशी पोलीस आणि सैन्याचा इतका कडेकोट पहारा असताना कुणा सोम्यागोम्याला लाल किल्ल्यावर इतक्या सहजपणे झेंडा फडकावता येईल? ’वरून आलेल्या आदेशा’विना ते शक्यच नाही! पोलिसांनी निशाण साहिबचा झेंडा लगेच उतरवला तर नाहीच, पण तो पुढे दोन तास तसाच ठेवला. त्याचे लाचार गोदी मीडियाला यथेच्छ चित्रण करायची संधी मिळावी यासाठी. पंजाब आणि उर्वरित भारत यांच्यात धार्मिक पाचर ठोकून शेतकरी एकजूट मोडण्याचा त्यांचा उद्देश स्पष्ट होतो.

सिंघू सीमेवरील आंदोलन २६ नोव्हेंबरला सुरू झाले तेव्हा किसान मजदूर संघर्ष समिती त्यात सामील झाली नव्हती. तिचे अनुयायी १५-२० दिवसांनंतर आले आणि पोलिसांनीच त्यांना एक वेगळी जागा दिली. ट्रॅक्टर परेडसाठी ठरवलेला मार्ग आपल्याला मान्य नसून आपण दिल्लीत प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यांनी ठरलेल्या वेळेच्या आधी दोन तास म्हणजे सकाळी ८ वाजताच आपली मिरवणूक सुरू केली. पोलिसांनी त्यांना अटकाव करण्याचा कसलाही प्रयत्न केला नाही. आणि ते दिल्लीला पोचल्यावरच पोलिसांनी त्यांच्यावर दडपशाही केली.

पोलिसांविषयी इतरही अनेक तक्रारी आहेत. पलवल सीमेवरील आंदोलकांना ४५ किमी लांबीचा मार्ग नेमून दिला होता. पण पोलिसांनी १५ किमी अंतरावरच लाठीहल्ला सुरू केला. गाझीपूर सीमेवर त्यांनी ठरवून दिलेल्या मार्गावर उभारलेले बॅरिकेड्स हटवायला नकार दिला. पण काही विशिष्ट लोकांना दुसऱ्या मार्गावरून जायची मुभा दिली.

भाजपच्या केंद्र सरकारचे कपट कारस्थानः गेले दोन महिने कमालीच्या शांततेत चाललेले आंदोलन बदनाम करण्यासाठी भाजप सरकारने आपले दलाल मुक्रर केले हा निष्कर्ष वादातीत आहे. २२ जानेवारी रोजी केंद्र सरकारची संयुक्त किसान मोर्चासोबत अकरावी बैठक झाली. तीत कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर म्हणाल्याचे सांगतात: “२६ जानेवारीसाठी तुमची तयारी सुरू करा, आम्ही आमची तयारी सुरू करतो.” ते कशाची “तयारी” करत होते, हे आता जगापुढे उघड झाले आहे. भाजपच्या या कटकारस्थानाचे काही मध्यवर्ती माध्यमांनी आणि सोशल मीडियाने मोठ्या प्रमाणावर वस्त्रहरण केल्याचे आपण पाहत आहोत.

नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या नेतृत्वाखालील भाजपचे केंद्र सरकार अजून किमान चार बाबतीत दोषी आहे. एक, अंबानी-अदानींच्या हिताखातर केलेले तीन कृषी कायदे आणि चार श्रम संहितांच्या विरोधातील हे आंदोलन मरणाच्या थंडीत दोन महिने चालवायला शेतकऱ्यांना भाग पाडले. यातून हे सरकार अत्यंत संवेदनाशून्य आणि निगरगट्ट असल्याचे दिसून आलेच, पण ते अंबानी-अदानी यांच्यापुढे किती लाचार आहे हेही लपून राहिले नाही. दुसरे, शांततामय रीतीने दिल्लीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, अश्रूधूर, पाण्याचा जबरदस्त मारा करून छळण्याचा पराक्रम याच भाजपच्या केंद्र आणि हरयाणा सरकारने केला आहे. तिसरे, खलिस्तानी, माओवादी, नक्षलवादी, पाकिस्तानी-चिनी एजंट म्हणत या लढवय्या शेतकऱ्यांना हिणवायचे कामही भाजप-रास्व संघाचे वरिष्ठ नेते करत आले आहेत. चौथे, आंदोलन मोडण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या ताब्यातील दिल्ली पोलिसांनी शेतकरी आणि त्यांच्या नेत्यांवर २५ एफआयआर दाखल केल्या आहेत. पण या बेडर शेतकरी आंदोलनाने या आधीची सर्व कारस्थाने मोडून काढली. तसेच हेही कारस्थान ते मोडून काढतील, यात शंका नाही.

पुढील दिशा दाखवणारी संयुक्त किसान मोर्चाची पत्रकार परिषदः वरील सर्व निष्कर्ष काढल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी २७ जानेवारी रोजी सिंघू सीमेवर एक पत्रकार परिषद आयोजित केली. किसान ट्रॅक्टर परेडच्या अभूतपूर्व यशाबद्दल शेतकऱ्यांचे अभिनंदन करतानाच त्यांनी काही टोळक्यांनी भाजप सरकार आणि पोलीस यांच्याशी संगनमत करून घडवलेल्या हिंसाचाराशी आपला कसलाही संबंध नसल्याचे जाहीर केले. त्यांची नावे घेऊन त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालायचे जाहीर आवाहन केले. २६ जानेवारीचा कार्यक्रम संयुक्त किसान मोर्चाच्या निशाणाखाली आयोजित केलेला असल्याने त्यातील घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचे धैर्य त्यांनी दाखवले. त्या घटनांविषयी खेद व्यक्त करून केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होणार असलेल्या १ फेब्रुवारीला ठरलेला संसदेवरील मार्चा पुढे ढकलला. त्याचसोबत ३० जानेवारी हा महात्मा गांधींची नथुराम गोडसेने हत्या केल्याचा हुतात्मा दिन मोठ्या प्रमाणावर पाळण्याची हाक देशभरातील जनतेला दिली. त्या दिवशी सत्य, अहिंसा आणि शांततेच्या संरक्षणार्थ एक दिवसाचा उपवास करायचा संकल्प सोडला. सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत शेतकरी लढा चालूच राहील, असा निर्धार संयुक्त किसान मोर्चाने व्यक्त केला.

आज २९ जानेवारीला सुरू झालेल्या संसदेच्या सत्रात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर २१ विरोधी पक्षांच्या खासदारांनी सामूहिक बहिष्कार टाकून मोदी सरकारचा तीव्र निषेध केला आणि शेतकरी आंदोलनाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. भाजपच्या केंद्र सरकारच्या दडपशाहीवर आणि गद्दारीवर मात करून हे ऐतिहासिक शेतकरी आंदोलन विजयाकडे आगेकूच करेल यात काहीच शंका नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा