दिल्लीत ‘रण’तंत्र दिनः बॅरिकेड्स तोडून शेतकरी लाल किल्ल्यात घुसले, अनेक भागांत इंटरनेट बंद

0
130
छायाचित्र सौजन्यः एनडीटीव्ही

नवी दिल्लीः मोदी सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शांततेत  सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आज गणतंत्र दिनीच हिंसक वळण लागले. सीमेवर लावलेले बॅरिकेड्स तोडून शेतकरी दिल्लीत घुसले. दिल्लीत ठिकठिकाणी पोलिस आणि शेतकऱ्यांत चकमकी झडल्या. त्यामुळे गणतंत्र दिनाला दिल्लीत ‘रण’तंत्र दिनाचे स्वरुप मिळाले.  या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अनेक भागांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक बोलवली आहे.

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज ट्रॅक्टर परेड काढली. ही ट्रॅक्टर परेड ठरवून दिलेल्या मार्गावरून न जाता दुसऱ्याच मार्गाने जाऊन दिल्लीत घुसली. शेतकऱ्यांच्या एका गटाने लाल किल्ल्यात घुसून तेथे झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला. येथे पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीमार केला आणि त्यांना बाहेर काढले. मात्र हे शेतकरी पुन्हा लाल किल्ल्यात घुसले आणि त्यांनी तेथे दुसरा तिरंगा झेंडा फडकवला. अद्यापही काही शेतकरी लाल किल्ल्यात असल्याचे सांगण्यात येते.

 प्रजासत्ताक दिनाची परेड संपल्यानंतरच शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड काढावी, असे ठरले होते. मात्र ठरवून दिलेल्या वेळेआधीच शेतकरी ट्रॅक्टर घेऊन सिंघू आणि टिकरी सीमेवर बॅरिकेड्स तोडून निघाले. सिंघू सीमेवरून ठरवून दिलेल्या मार्गाने न जाता शेतकरी आयटीओपर्यंत पोहोचले. आयटीओमध्ये शेतकऱ्यांनी जोरदार गोंधळ घातला. डीटीसीच्या बसेसची तोडफोड केली. पोलिसांच्या मागे ट्रॅक्टर पळवून हल्ल्याचा प्रयत्न केला.

गाझीपूर सीमेवरही शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडले. अक्षरधाम नोएडा वळण रस्त्यावरही शेतकरी आणि पोलिसांत जोरदार धुमश्चक्री झाली. काही ठिकाणी हिंसाचाराच्या किरकोळ घटनाही घडल्या. ट्रकसह काही सरकारी वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. मुबारक चौकात तर परिस्थिती खूपच चिघळली होती.

टिकरी सीमेच्या पुढे नांगलोईमध्येही पोलिसांचे बॅरिकेड्स तोडण्यात आले. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, लाठीमार केला. आयटीओकडून लाल किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र मोडून शेतकऱ्यांचा एक गट लाल किल्ल्यात घुसला.

दिल्लीच्या अनेक भागांत इंटरनेट सेवा बंदः शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये झालेला हिंसाचार आणि त्यामुळे निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता दिल्लीच्या काही भागांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सरकारच्या आदेशानंतर नांगलोईमध्ये जिओने आपली इंटरनेट सेवा बंद केली आहे. गृह मंत्रालयाने सिंघू, गाझीपूर, टिकरी, मुबारक चौक, नांगलोई आणि आसपासच्या परिसरातील इंटरनेट सेवा आज रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गृहमंत्री शाह यांनी बोलावली तातडीची बैठकः ट्रॅक्टर परेडमध्ये घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला गृह सचिव आणि दिल्लीचे पोलिस आयुक्तही उपस्थित आहेत. गृहमंत्री शाह यांना आज घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली.

हिंसाचार करणारे घुसखोर- संयुक्त किसान मोर्चाचा दावाः दरम्यान, ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचाराचा शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने निषेध केला आहे. दिल्लीच्या विविध भागात ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचाराला जे लोक जबाबदार आहेत, त्यांचा संयुक्त किसान मोर्चाशी काहीही संबंध नाही. असामाजिक तत्वांनी शांततापूर्ण आंदोलनात घुसखोरी केली. आम्ही नेहमीच हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्याचे ठरवले आहे. शांतता आमची सर्वात मोठी ताकद आहे. कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन करून आंदोलनाला नुकसान पोहोचू द्यायचे नाही, असा आमचा हेतू आहे, असे संयुक्त किसान मोर्चाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या मोर्चात ४० शेतकरी संघटनांचा सहभाग आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा