गाझीपूर सीमेवर पोलिस क्रॅकडाऊनच्या तयारीत, अन्याय केल्यास आत्महत्येची टिकैत यांची धमकी

0
260
छायाचित्रः ट्विटर

नवी दिल्लीः दिल्लीला लागून असलेल्या गाझीपूर सीमेवर उत्तर प्रदेश सरकारने रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात केली आहे. ही सीमा रिकामी करण्याची कारवाई कोणत्याही क्षणी केली जाऊ शकते. गाझीपूर सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलिस आणि अर्धसैनिक दलाचे जवानही सकाळपासूनच तैनात आहेत. तेथे पोलिसांनी फ्लॅग मार्चही केला. मोठ्या प्रमाणात सरकारी बसेसही आणून उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलिस धरणे देणाऱ्या शेतकऱ्यांना जबरदस्तीने हटवू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी उपोषण सुरु केले असून शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे.

 प्रजासत्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर परेडमध्ये हिंसाचार झाल्यानंतर शेतकरी आंदोलनाला वेगळे वळण लागले आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने गाझीपूर सीमेवरील सर्व सुविधा काढून घेतल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे राकेश टिकैत यांनी आक्रमक भूमिका घेत उपोषण सुरू केले आहे. आता पाणी पिणार नाही, गावाकडून पाणी आल्यावरच पिऊ. देशातील शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द केलेजाईपर्यंत आंदोलन सुरूच राहील. धरणे सुरू असलेली जागा आम्ही खाली करणार नाही, असे टिकैत म्हणाले.

येथे भाजपचे आमदार आले आहेत. त्यांच्यासोबत बंदुका आणि दंडे घेऊन शंभरच्या वर कार्यकर्ते उभे आहेत. ते शेतकऱ्यांना मारत आहेत. शेतकऱ्यांची हत्या केली जाऊ शकते. मी शेतकऱ्यांसोबत काहीही चुकीचे होऊ देणार नाही. शेतकऱ्यांसोबत वाईट होत असलेले मी पाहू शकत नाही. तिन्ही कृषी कायदे मागे घेतले नाही तर मी आत्महत्या करीन, असे टिकैत म्हणाले.

उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद प्रशासनाने धरणे देत असलेल्या शेतकऱ्यांना गाझीपूर सीमा खाली करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटिसीत गुरूवारी रात्रीपर्यंत ही जागा रिकामी करण्याची मुदत देण्यात आली आहे. आज गुरूवारी दुपारी ही नोटीस बजावण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन संपुष्टात आणण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासनाला दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांना संबोधित करताना राकेश टिकैत शांतता राखण्याचे आवाहन करताना म्हणाले की, आम्ही अटक व्हायला तयार आहोत. सरकारला वाटत असेल तर लेखी कारवाई करून अटक करावी. ही वैचारिक लढाई आहे. वैचारिक क्रांती आहे.ती विचारानेच संपेल, लाठ्या-काठ्यांनी नव्हे.

 जर हिंसाचार झाला तर त्यासाठी प्रशासन जबाबदार असेल. जर गोळ्या चालवल्या गेल्या तर त्यासाठी प्रशासन जबाबदार असेल. शेतकऱ्यांना आंदोलनाच्या मार्गावरून भरकटवण्याचा प्रयत्न झाला. आंदोलन चिरडून टाकण्याचा कट रचण्यात आला. प्रशासनाने शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवले. त्यांची दिशाभूल केली, असे सांगतानाच धरणे सुरू असलेली जागा रिकामी करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा