मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या वेळी थाळ्या वाजवाः शेतकऱ्यांचे देशवासियांना आवाहन

0
114
किसान युनियन.

नवी दिल्लीः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या वेळी त्यांचे संपूर्ण भाषण संपेपर्यंत थाळ्या वाजवा, असे आवाहन भारतीय शेतकरी संघटनेचे नेते जगजितसिंग डालेवाला यांनी केले आहे. येत्या २७ डिसेंबरला प्रधानमंत्री मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.

मोदी सरकारने लागू केलेले तीन नवीन कृषी कायदे मागे घ्या, या मागणीसाठी शेतकरी गेल्या २५ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनात आजपर्यंत ४० शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांसाठी आज देशभर श्रद्धांजली सभांमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. श्रद्धांजली सभेनंतर आंदोलक शेतकऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन देशवासियांना हे आवाहन केले आहे.

 २३ डिसेंबरला अन्नत्याग कराः येत्या २३ डिसेंबर, बुधवारी जागतिक शेतकरी दिन आहे. या दिनानिमित्त सर्वांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक दिवस अन्नत्याग करावा,असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांनी याच पत्रकार परिषदेत केले आहे.

सरकारने काहीही केले तरी हटणार नाहीः दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधून येत असलेल्या शेतकऱ्यांना पन्नास-पन्नास लाखांच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. त्यांना दिल्लीला येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारने काहीही केले तरी शेतकरी मागण्या मान्य होईपर्यंत येथून हटणार नाहीत, असे टिकैत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा