सरकारच्या ‘भींती’मुळे आंदोलनाची कोंडीः पाणी, शौचालयाअभावी शेतकऱ्यांची दैना; रोगराईचा धोका

0
165
छायाचित्र सौजन्यः ट्विटर

नवी दिल्लीः तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची पोलिसांनी आंदोलनस्थळी उभारलेल्या बहुस्तरीय बॅरिकेड्स, रस्ता खोदून ठोकलेले खिळे आणि काटेरी कुंपणामुळे चांगलीच कोंडी झाली आहे. सरकारने उभारलेल्या या ‘तटबंदी’मुळे तिन्ही आंदोलनस्थळी धरणे देत असलेल्या शेतकऱ्यांना पाणी आणि शौचालयाची सुविधा मिळणेही अवघड होऊन बसले आहे.

२६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताकदिनी उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिस प्रशासनाने सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तिन्ही आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर बॅरिकेड्स, सिंमेट्सचे स्लॅब आणि काटेरी तारांचे कुंपण टाकले आहे. टिकरी आणि गाझीपूर सीमेवर आंदोलनस्थळी जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी लोखंडी खिळेही ठोकले आहेत.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलनाचे सर्वात मोठे ठिकाण ठरलेल्या सिंघू सीमेवर टाकण्यात आलेल्या बॅरिकेडिंगमुळे आंदोलक शेतकऱ्यांना सुमारे १०० पोर्टेबल शौचालये वापरणे अशक्य झाले आहे. या शौचालयांपासून काही मीटर अंतरावर पोलिस आता तात्पुरत्या स्वयंपाक घरासाठी तंबू उभारत आहेत.

गुरदासपूरचा हरभजनसिंग गेल्या महिनाभरापासून अधिक काळ या आंदोलनात सहभागी आहे. बॅरिकेडिंगमुळे कोंडी झाल्याने अनेक शेतकऱ्यांना उघड्यावरच शौचास जावे लागत आहे. येथे सध्या खूपच कमी शौचालये आहेत. पेट्रोलपंपाजवळ एकच शौचालय आहे. या परिसरातील शेकडो शौचालयांचा आम्हाला वापरच करता येत नसल्यामुळे पेट्रोलपंपावरील शौचालयाबाहेर भली मोठी रांग लागते, असे हरभजनसिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. २६ जानेवारीपासून पाणीपुरवठा बंद करण्यात आल्याचा आरोप सिंघू सीमेवरील शेतकऱ्यांनी केला आहे.

हेही वाचाः ‘न घडलेल्या अपमानावर काहूर माजवणे हा सुद्धा तिरंग्याचा अपमानच!’

दिल्ली पोलिसांनी सिंघू सीमेवर मला आणि दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष राघव चढ्ढा यांना प्रतिबंध केला आहे, असे दिल्लीचे पाणीपुरवठा मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले. दिल्ली पोलिस जल बोर्डाचे पाण्याचे टँकर सिंघूला पोहोचू देत नाहीत. ते ‘उपर से ऑर्डर है’ एवढेच सांगतात. आमचे टँकर तेथे पोहोचावेत म्हणून आम्ही दररोज प्रयत्न करत आहोत, असे चढ्ढा यांनी सांगितले.

माध्यमांच्या प्रतिनिधींनाही मुख्य रस्त्यावरील बॅरिकेड्स ओलांडून आंदोलनस्थळी पोहोचू दिले जात नाही. त्यांना आता शेतातून किंवा मधल्या मार्गाने आंदोलनस्थळी पोहोचावे लागत आहे.

आंदोलकांची ही अडचण पाहून स्थानिकांनी आसपासच्या कंपन्यांतील शौचालये वापरू दिली आहेत. मात्र काही ठिकाणी काही किलोमीटर चालत जाऊन शौचालय गाठावे लागते, असे सिंघू सीमेवर आंदोलन करत असलेल्या आनंदपूर साहिबच्या रविंद्रसिंग यांनी सांगितले.

हेही वाचाः केंद्रीय अर्थसंकल्प २०२१: शेतमालाला हमीभाव देणाऱ्या दोन प्रमुख योजनांच्या निधीत मोठी कपात!

टिकरी सीमेवर मंगळवारी कचऱ्याचे ढिगच परसलेले दिसले. सोमवारपासून सफाई कर्मचारीच आले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सिंघू आणि टिकरी ही आंदोलनस्थळे हरियाणात तर गाझीपूरचे आंदोलनस्थळ उत्तर प्रदेशात येते. ‘प्रजासत्ताकदिनापूर्वी सफाई कर्मचारी येऊन साफसफाई करून जायते. पण ते आता येतच नाहीत. आम्ही कचरा एकत्र करतो आणि बाजूला टाकतो. यावर वेळीच काही केले गेले नाही तर आंदोलक शेतकऱ्यांत रोगराई पसरण्याचा धोका आहे,’ असे पंजाबच्या भटिंडाचे ५२ वर्षीय आंदोलक रणजीतसिंग म्हणाले.

सिंघूप्रमाणेच टिकरी सीमेवरही शेतकऱ्यांना शौचालय वापरू देण्यास मनाई करण्यात आली आहे. काही शौचालयांना प्रशासनाने कुलूपे ठोकल्याचा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे. आम्ही काही शौचालयांची कुलुपे तोडून ती उघडली आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले. येथील शेतकऱ्यांनाही आसपासचे पेट्रोलपंप किंवा धार्मिकस्थळावरील शौचालये वापरावी लागत आहेत.

दिल्लीचे पोलिस आयुक्त एस.एन. श्रीवास्तव यांनी या बॅरिकेडिंगचे समर्थन केले आहे. २६ जानेवारी रोजी पोलिसांवर हल्ला करण्यासाठी ट्रॅक्टर वापरण्यात आले आणि पॅरिकेडिंग तोडण्यात आले तेव्हा त्यावेळी कुणीही प्रश्न का उपस्थित केले नाहीत, असा सवाल त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. आता आम्ही काय केले? पुन्हा कोणालाही तोडता येऊ म्हणून आम्ही बॅरिकेडिंग अधिक भक्कम केली आहे, असे श्रीवास्तव म्हणाले.

छळवणूक थांबवल्याशिवाय आता चर्चा नाहीचः दिल्ली पोलिस आणि प्रशासनाने चालवलेली आंदोलक शेतकऱ्यांची छळवणूक तत्काळ थांबवल्याशिवाय सरकारशी कोणतीही औपचारिक चर्चा केली जाणार नाही, असे संयुक्त किसान मोर्चाने दिल्ली पोलिसांनी उभारलेली बहुस्तरीय बॅरिकेडिंग आणि इंटरनेटसेवा बंदीचा संदर्भ देत म्हटले आहे. पोलिसांचे बॅरिकेडिंग शेतकऱ्यांना रोखू शकणार नाही. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत आंदोलन चालवण्याची शेतकऱ्यांची तयारी आहे, असे भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी गाझीपूर सीमेवर बोलताना सांगितले.

वाढवण्यात आलेली बॅरिकेडिंग रस्त्यावर ठोकण्यात आलेले लोखंडी खिळे, काटेरी तारांचे कुंपण आणि अंतर्गत रस्ते बंद, इंटरनेटसेवा बंद करणे, भाजप-आरएसएसच्या कार्यकर्त्यांमार्फत शेतकऱ्यांच्या विरोधात निषेध आंदोलन घडवून आणणे, रेल्वेचे मार्ग बदलणे, निर्धारित स्टेशनवर पोहोचण्याआधीच रेल्वे थांबवणे हे सरकारने घडवून आणलेल्या बहुस्तरीय हल्ल्याचाच एक भाग आहेत. पोलिस आणि प्रशासनच आंदोलक शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, असे संयुक्त किसान मोर्चाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. एकीकडे प्रधानमंत्री एका कॉलच्या अंतरावर तोगडा आहे म्हणतात आणि दुसरीकडे सरकार आंदोलनस्थळांची कोंडी करून सुविधा बंद करण्याबरोबरच लोकांची गैरसोय करण्याचे सर्व प्रयत्न करत आहे, असेही मोर्चाने म्हटले आहे.

… अन्यथा ४० लाख ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरूः आम्ही सरकारला ऑक्टोबरपर्यंतची वेळ दिली आहे. जर त्यांनी आमचे ऐकले नाही तर आम्ही ४० लाख ट्रॅक्टर घेऊन देशभरात रॅली काढू. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आम्ही प्रवास करू. येथील आंदोलनही सुरूच राही. जोपर्यंत कायदे मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. झारखंडचे कृषीमंत्री बादल पारेख यांनी गाझीपूर सीमेवर भेट दिल्यानंतर टिकैत यांनी हे वक्तव्य केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा